देश
शिक्षण क्षेत्रातल्या आणखी एका मोठा घोटाळ्याचा पर्दाफाश, पॅथोलॉजी लॅबसाठी चक्क बोगस प्रमणापत्रांचं वाटप
राज्यात सर्वाधिक घोटाळे शिक्षण क्षेत्रात होत असल्याचं समोर येत आहे. आता असाच एक घोटाळा नाशिकमधल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात (Yashwantrao Chavan Open University) उघडकीस आला आहे. परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिलं जातं. मात्र विद्यापीठात प्रवेश न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र (Bogus Certificates) दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक मधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश न घेता चार जणांनी 20 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिलं. या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात (Nashik Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे चारही संशयित नागपूर, कराड, अहमदनगर आणि मनमाड इथले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण?
विज्ञान पदवी, मेडिकल लॅब टेक्निशियन (एमएलटी) आणि डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (डीएमएलटी) (Pathology) या अभ्यासक्रमाचे 20 विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या नावाने बनावट गुणपत्रक, पदवी, पदविका तसंच विद्यापीठाच्या बनावट नावासह पदवी पडताळणीचे बनावट प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. याच आधारे या संशयित विद्यार्थ्यांना पॅथालॉजी व्यवसाय सुरु करायचा होता. पॅथालॉजी नोंदणीसाठी मुंबई इथल्या महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेकडे कागदपत्रे सादर करण्यात आली होती. यानंतर हि सर्व कागदपत्र पडताळणी करण्यासाठी मुक्त विद्यापीठाकडे सादर करण्यात आली. त्यावेळी विद्यापीठाच्या उत्तीर्ण यादीत संबंधित मुलांची नावे आढळली नाही. यानंतर पडताळणीत विद्यार्थ्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आले.
असा झाला घोटाळा उघड?
2020 मध्ये बनावट प्रमाणपत्राच्या आधारे पॅथालॉजी नोंदणीसाठी महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेकडे अर्ज करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रमाणपत्रात काही संशयास्पद बाबी दिसून आल्या. यानंतर सर्व कागदपत्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडे पडताळणीसाठी पाठवीण्यात आले होते. विद्यापीठाच्या कुठल्याच यादीत विद्यार्थ्यांचे नाव नव्हते. याची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने समिती नेमली होती. या समितीच्या अहवालात प्रमाणपत्रे बनावट असल्याचे सिद्ध होऊन संबंधित संशयितांना नोटीसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी दिली.