देश
शीना बोरा हत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केल्याने मारियांची बदली ?
शीना बोरा हत्याप्रकरणात पीटर मुखर्जीचा सहभाग नाही अशी चुकीची माहिती मला देण्यात आली होती अशी कबूली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देणारे कोण आणि या चुकीची माहितीमुळेच राकेश मारिया यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन गच्छंती झाली का या चर्चेला उधाण आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली असून यात शीना बोरा हत्याप्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. शीना बोरा हत्याप्रकरणाचा तपास करताना मुंबई पोलिसांनी इंद्राणी मुखर्जी आणि तिच्या साथीदारांना अटक केली होती. मात्र सीबीआयकडे तपास गेल्यावर पीटर मुखर्जी यांनादेखील अटक करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित झाले होते. यावर मुख्यमंत्री म्हणाले, सावत्रमुलगी शीना बोराच्या हत्येत पीटर मुखर्जीचा सहभाग नाही हीच माहिती मला नेहमी दिली जात होती. अगदी सीबीआयकडे तपास देईपर्यंत मला ही चुकीची माहिती दिली गेली अशी कबुली त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरुन आता तर्कवितर्क लढवले जात आहे.
शीना बोरा हत्याप्रकरणात अति हस्तक्षेप केल्याने तत्कालीन आयुक्त राकेश मारिया यांची उचलबांगडी झाली अशी चर्चा त्यावेळीही रंगली होती. आता मुख्यमंत्र्यांनीही दिशाभूल केल्याचे विधान केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करणारे मुंबई पोलीस दलातील ते अधिकारी कोण आणि यामुळेच राकेश मारिया यांची बदली झाली का याविषयी चर्चा रंगल्या आहेत. पण मारिया यांच्या निकटवर्तीयांनी हा दावा फेटाळून लावला आहे. बदली होण्याच्या १२ दिवसांपूर्वी राकेश मारियांनी शीना बोरा प्रकरण हाताळले. या कालावधीत त्यांनी कधी मुख्यमंत्र्यांना माहिती दिलीच नव्हती असे मारिया यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.