खेल
हॉकी चौरंगी मालिका – भार
न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या चौरंगी हॉकी मालिकेत भारतीय हॉकी संघ सध्या चांगली कामगिरी करताना पहायला मिळतोय. दुसऱ्या सत्रात सलामीच्या सामन्यात यजमान न्यूझीलंडवर मात केल्यानंतर आज भारताने बलाढ्य बेल्जियमला पराभवाची धूळ चारली. हॅमिल्टन येथे झालेल्या सामन्यात भारताने बेल्जियमचं आव्हान ५-४ असं परतवून लावलं.
पहिल्या सत्रातील अंतिम सामन्यात भारताला बेल्जियमकडून १-२ असा पराभव स्विकारावा लागला होता. मात्र आजच्या सामन्यात अखेरच्या मिनीटापर्यंत सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवत भारताने आपला विजय निश्चीत केला. आजच्या सामन्यात रुपिंदरपाल सिंह (४ थे आणि ४२ वे मिनीट), हरमनप्रीत सिंह (४६ वे मिनीट), ललित उपाध्याय (५३ वे मिनीट) आणि दिलप्रीत सिंह (५९ वे मिनीट) यांनी गोल झळकावले. तर बेल्जियमनकडून जॉन जॉन डोमेन, फेलिक्स डेनायर, अॅलेक्झांडर हेंड्रीक्स आणि टॉम बून यांनी गोल झळकावले.
भारतीय संघाचे प्रशिक्षक जोर्द मरीन यांनी या सामन्यासाठी विशेष रणनिती आखली होती. Two Touch Hockey चं तंत्र वापरत भारतीय खेळाडूंनी बेल्जियमचा बचाव भेदला. यामुळे भारतीय खेळाडूंना बेल्जियमच्या तुलनेत गोल करण्याच्या जास्त संधी मिळाल्या, ज्याचा फायदा भारतीय खेळाडूंनी पुरेपूर उचलला. रुपिंदरपाल सिंहने सामन्यात पहिला गोल करत बेल्जियमला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या बेल्जियमने भारताला कडवी टक्कर देत सामन्यात पुनरागमन केलं. मात्र भारतीय खेळाडूंनी अष्टपैलू खेळ करत अखेरच्या क्षणापर्यंत सामन्यावर वर्चस्व कायम राखत आपला विजय निश्चीत केला.