देश
हॉटेल, रेस्तराँच्या अग्निसुरक्षेची माहिती अॅप ऑनलाइन कळवा हायकोर्टाचे महापालिकेला निर्देश
मुंबई हायकोर्टाने आज मुंबई महापालिकेची कान उघडणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. हॉटेल्स, रेस्तराँ यांच्या मोबाइल अॅपमधून महापालिकेने काहीतरी शिकावं असं कोर्टानं म्हटलंय. एवढंच नाही तर लोकांच्या सोयीसाठी खासगी अस्थापनांचे परवाने आणि अग्निसुरक्षेची माहिती मोबाइल अॅप किंवा ऑनलाइन जाहीर करावी असे आदेश मुंबई हायकोर्टाने महापालिकेला दिले आहेत.
मागील वर्षी मोजो बिस्ट्रो आणि वन अबव्ह या दोन पब्जना आग लागली होती. या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला होता. ही दोन्ही पब्ज बेकायदा होती असेही नंतर समोर आले. त्यानंतर मुंबईत आग लागण्याच्या घटनाही बऱ्याच ठिकाणी घडल्या. महापालिकेवर टीकेचे ताशेरेही झाडण्यात आले. तसेच या पबच्या मालकांनाही अटक करण्यात आली.
मोजो बिस्ट्रो पबमध्ये हुक्का सर्व्ह करण्यास परवानगी नव्हती. मात्र या हुक्क्यामुळेच आग लागली होती आणि ही आग वन अबव्ह या पबपर्यंत पोहचली. या आगीच्या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर महापालिका, प्रशासन या सगळ्यांवरच टीका झाली होती. आता कोर्टानेही महापालिकेचे कान टोचत हॉटेल्स रेस्तराँ लोकांच्या सोयीसाठी खासगी अस्थापनांचे परवाने आणि अग्निसुरक्षेची माहिती मोबाइल अॅप किंवा ऑनलाइन जाहीर करावी असे निर्देश दिले आहेत.