देश
हल्ल्याच्या रात्री काय घडलं, जैशच्या मदरशामधील मुलाने सांगितला थरारक अनुभव
बालकोट येथे भारतीय हवाई दलाने एअरस्ट्राइक केल्यानंतर लगेचच पाकिस्तानी लष्कराने या भागातील जैश-ए-मोहम्मदच्या मदरशामधून विद्यार्थ्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवले. या विद्यार्थ्यांना काही दिवस सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले होते. नंतर त्यांना घरी पाठवून देण्यात आले अशी माहिती समोर आली आहे. हल्ल्याच्यावेळी तिथे असलेल्या एका विद्यार्थ्याच्या नातेवाईकाच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.
बालकोटमध्ये तालीम-उल-कुरान हा जैशचा मदरसा होता. २६ फेब्रुवारीच्या एअरस्ट्राइकमध्ये हा मदरसा टार्गेट होता. बालकोटमधील जाभा टेकडीवर हा मदरसा होता. हल्ला होण्याच्या आठवडाभर आधीपासून या मदरशाला पाकिस्तानी लष्कराकडून संरक्षण देण्यात आले होते असे विद्यार्थ्याच्या नातेवाईकाने सांगितले. २६ फेब्रुवारीच्या पहाटे मी आणि अन्य काही जण एका खोलीत झोपलो होतो. त्यावेळी स्फोटाच्या मोठया आवाजाने आम्हाला जाग आली. त्या आवाजावरुन स्फोट जवळपासच कुठेतरी झाल्याचे जाणवले असे या विद्यार्थ्याने त्याच्या कुटुंबियांना सांगितले.
स्फोटाच्या आवाजाने काही वेळासाठी घबराट निर्माण झाली होती. पण त्यानंतर आम्ही कुठलाही आवाज ऐकला नाही पुन्हा झोपायला गेलो. भूकंपाचे हादरे किंवा आपल्याला भ्रम झाला असे त्या मुलांना वाटले आणि ते पुन्हा झोपायला गेले असे या नातेवाईकाने सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी ही मुले उठवली तेव्हा पाकिस्तानी सैन्याने या मुलांना ते राहत असलेले ठिकाण सोडायला सांगितले अशी माहिती या नातेवाईकाने दिली.
पाकिस्तानचे सैनिक या मुलांना दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले. पण ते ठिकाण कुठे होते हे माहित नाही. दोन ते तीन दिवस या मुलांना तिथे ठेवले. मदरशामध्ये भरपूर लोक होते पण त्या सर्वांनाच सुरक्षित स्थळी नेले नाही. फक्त काही मुलांनाच ते सुरक्षित स्थळी घेऊन गेले. दुसऱ्या मुलांबरोबर काय झाले किंवा स्फोट कुठे झाले ते माहित नाही असे या नातेवाईकाने सांगितले.
हल्ला होण्याच्या काही दिवस आधी पाकिस्तानी सैनिकांना मदरशाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते असे या विद्यार्थ्याने त्याच्या कुटुंबियांना सांगितले. मदरशाचे फोटो बाहेर लीक झाल्यामुळे सैनिकांना तैनात केले होते असे या मुलाच्या नातेवाईकाने सांगितले. दोन ते तीन दिवस या मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवल्यानंतर त्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले.
त्या मुलाला पुन्हा मदरशामध्ये जायचे आहे. त्याला लग्न करुन घरीच राहण्याचा सल्ला काहीजणांनी दिला. पण त्या मुलाला पुन्हा मदरशामध्ये जायचे आहे असे या मुलाच्या नातेवाईकाने सांगितले. एअर स्ट्राइकमध्ये जैशच्या चार इमारतींना टार्गेट करण्यात आल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने शनिवारी दिले होते. पण तांत्रिक मर्यादा आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी गुप्तचर नेटवर्क नसल्यामुळे नेमके किती दहशतवादी ठार झाले ते ठामपणे सांगता येत नाहीय.