अपराध समाचार
राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला मनसैनिकांकडून मारहाण
- 270 Views
- May 05, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला मनसैनिकांकडून मारहाण
- Edit
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात अंबरनाथमध्ये राहणाऱ्या संदीप तिवारी या तरुणाने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती.
अंबरनाथच्या पूर्वेकडील धारा रेसिडेन्सी संकुलात शनिवारी हा प्रकार घडला. संदीप तिवारी या तरुणाने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या कार्यालयात आणून संदीप तिवारीला उठाबश्या काढायला लावल्या आणि मारहाण केली. याबाबतचा व्हिडीओ प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या घटनेचं समर्थन केलं असून, ‘टीका करावी, टीका करणे हा लोकशाहीचा हक्क आहे पण जर कमरेखालची टीका कोणी करणार असेल तर त्यांना असाच धडा शिकवला जाईल’ असा इशारा प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.
याआधीही मनसेविरोधात पोस्ट टाकणाऱ्या अनेकांना अशाप्रकारे मारहाण करण्यात आली आहे. राज ठाकरेंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका तरुणाला चपलेने चोप दिला होता, तर पुणे, औरंगाबादेतही एकावर शाईफेक करुन मारहाण करण्यात आली होती. याशिवाय मुंबईच्या घाटकोपर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीनेही मध्यंतरी राज ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याचे राहते घर शोधले. त्यांच्या घरात जाऊन त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच त्यांनी लिहिलेल्या पोस्टबाबत त्यांना जबरदस्ती करत माफी आणि उठाबश्याही काढायला लावल्या होत्या.