देश
सिलेंडरचा स्फोट झाल्याने कोसळली दोन मजली इमारत, १० जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशात मऊ येथे सोमवारी सकाळी सिलेंडरचा स्फोट झाल्याने दोन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. स्फोट इतका जबरदस्त होता की, दोन मजली इमारत अक्षरश: जमीनदोस्त झाली. इमारतीचा मलबा हटवण्याचं काम सुरु असून अनेकजण खाली दबले असण्याची भीती आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त करत जखमींना योग्य उपचार देण्याचा आदेश दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मऊ येथील मोहम्मदाबाद कोतवाली परिसरातील वलीदपूर येथे एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली. स्फोटामुळे दोन मजली इमारत पत्त्याप्रमाणे कोसळली. अचानक कोसळलेल्या या संकटातून वाचण्याची संधीही लोकांना मिळाली नाही.
पोलिसांकडून बचावकार्य सुरु
स्फोटाचा आवाज ऐकल्यानंतर परिसरात एकच धावपळ सुरु झाली होती. शेजारी राहणारे सर्व लोक अचानक झालेल्या या आवाजाने घराबाहेर आले होते. लोकांनी तात्काळ पोलिसांनी यासंबंधी माहिती दिली. सोबतच जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इमारतीच्या मलब्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलीस स्थानिकांसोबत मिळून बचावकार्य करत आहे.