मनोरंजन
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांची प्रकृती कशी? देओल कुटुंबाने दिली माहिती, ‘आज सकाळी 7.30 ला…’
89 वर्षीय ज्येष्ठ चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना 31 ऑक्टोबर रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी सकाळी रुग्णवाहिकेतून त्यांना घरी नेण्यात आलं. धर्मेंद्र यांच्यावर रुग्णालयात उपचार करणारे डॉ. प्रो. प्रीतित समदानी यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू राहतील असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
“धर्मेंद्रज यांना सकाळी 7.30 च्या सुमारास रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कुटुंबाने त्यांना घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतल्याने घरीच उपचार होतील,” असे ब्रीच कँडी हॉस्पिटलचे डॉ. प्रोफेसर प्रीतित समदानी यांनी सांगितलं आहे. धर्मेंद्र यांच्या कुटुंबानेही एक निवेदन जारी करून अभिनेत्याला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती दिली आहे.
“धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि घरीच त्यांच्यावर उपचार होतील. आम्ही मीडिया आणि लोकांना विनंती करतो की त्यांनी या काळात कोणत्याही प्रकारच्या अफवांपासून दूर राहावे आणि त्यांच्या व कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा. ते बरे व्हावेत यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आम्ही सर्वांचे प्रेम, प्रार्थना आणि शुभेच्छांचे आभार मानतो. कृपया त्यांचा आदर करा कारण ते तुमच्यावर प्रेम करतात,” असं कुटुंबाने म्हटलं आहे.
मंगळवारी अनेक माध्यमांनी धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त दिलं होतं. यानंतर हेमा मालिनी आणि ईशा देओल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला होता. “जे घडत आहे ते अक्षम्य आहे! जबाबदार चॅनेल्स उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि बरे होत असलेल्या व्यक्तीबद्दल खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेच्या गरजेचा योग्य आदर करा,” अशी पोस्ट हेमा मालिनी यांनी केली.
ईशा देओलची इंस्टाग्राम पोस्ट
“मीडिया फार घाईत दिसत असून, खोट्या बातम्या पसरवत आहेत. माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर असून, त्यात सुधारणा होत आहे. आम्ही सर्वांना आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करते. बाबांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद,” असं ईशा देओलने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं.
दरम्यान सनी देओलच्या टीमने, “धर्मेंद्र प्रतिसाद देत आहेत. कुटुंबाला चमत्काराची आशा आहे,” असं म्हटलं आहे. कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र 10 नोव्हेंबरपासून व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं मानलं जात आहे.