Menu

मनोरंजन
‘दबंग ३’मध्ये सलमानच्या ‘आई’ची एन्ट्री

nobanner

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया सध्या चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी डिंपल कपाडिया यांनी हॉलिवूडमध्ये पदार्पण केल्याच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं होतं. आता पुन्हा डिंपल कपाडिया सलमान खानच्या ‘दबंग ३’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘दबंग’च्या पहिल्या भागात डिंपल कपाडिया यांनी सलमानच्या आईची भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा त्या ‘दबंग’च्या पुढील भागातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘दबंग’च्या पहिल्या भागात डिंपल कपाडिया यांनी साकारलेल्या भूमिकेचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. ‘बॉलीवूडलाइफ डॉट कॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार, डिंपल कपाडिया ‘दबंग ३’मध्ये भूमिका साकारणार आहेत. ‘दबंग ३’ चुलबुल पांडेच्या भूतकाळात घेऊन जातो आणि तो असा का आहे? याबाबत गोष्टीचा उलगडा करण्यात येणार आहे. त्यामुळे डिंपल कपाडिया यांची पुन्हा एन्ट्री होणार असल्याचं बोललं जात आहे. डिंपल कपाडिया पुन्हा एकदा सलमान खानच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत.

गेल्या महिन्यात मध्य प्रदेशमध्ये ‘दबंग ३’ चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं. या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले होते. सलमानसह अरबाज खान आणि सोनाक्षी सिन्हादेखील चित्रपटातून दिसणार आहे. सलमानने नर्मदा नदी किनारी चित्रपटाचं चित्रीकरण केलं आहे.

सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘भारत’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटात कतरिना कैफ, दिशा पटानी, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोवर, तब्बू हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

डिंपल कपाडिया लवकरच हॉलिवूड दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान यांच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी याबाबत सोशल मीडियावरुन माहिती देण्यात आली होती.