Menu

देश,राजनीति
अपमानाचा बदला घेण्याची निवडणूक चांगली संधी – अमित शहा

nobanner

नवी दिल्ली, दि. ५ – ज्यांनी लोकांवर जुलूम करून त्यांची हत्या केली, त्या सरकारचा निवडणुकीच्या माध्यमातून बदला घेवून इज्जत राखणे आवश्यक आहे, असे चिथावणीखोर विधान भाजपचे महासचिव आणि नरेंद्र मोदी यांचे विश्वासार्ह सहकारी अमित शाह यांनी केले.
शाह यांनी गुरूवारी मुझ्झफरनगरपासून ४० किमी अंतरावरील राजहार गावातील सभेदरम्यान भडकावू भाषण केले. या सभेदरम्यान मुझफ्फरनगरमध्ये दंगली भडकावण्यात मागील वर्षी जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्यात आलेले भाजपचे आमदार सुरेश राणा हेही उपस्थित होते.
या सरकारचा बदला घेण्यासाठी, आपली इज्जत राखण्यासाठी ही निवडणूक चांगली संधी आहे, असे विधान शाह यांनी केले. एकवेळ माणूस अन्न-पाण्याशिवाय, झोपेशिवाय जगू शकेल, पण तो अपमान सहन करून जगू शकणार नाही असे सांगत ‘अपमानाचा बदला तर घ्यावाच लागेल,’ असे विधान करत हिंदूंची जास्तीत जास्त मते भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले.
जाट व दलित बहुल गावामध्ये अमित शाह यांनी त्यांच्या शैलीत मोदी पंतप्रधान होणे का जरूरीचे आहे हे पटवून देण्याचाही प्रयत्न केला. राजहार या गावात बत्तीसा खाप पंचायतीचे वर्चस्व असल्याने राजनैतिकदृष्ट्या हे गाव अतिशय महत्वाचे आहे.
दरम्यान या विधानामुळे शाह अडचणीत येण्याची शक्यता असून शाह यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.