Menu

देश,राजनीति
आडवाणींचे ‘मोदी’गान

nobanner

रविवार ६ एप्रिल २०१४ – व्यवस्थापनाची प्रशंसा : पण वाजपेयींशी तुलना अशक्य गांधीनगर : मागील काही दिवसांपर्यंत पक्षनेतृत्वासंदर्भात नाराजीचा सूर लावणार्‍या लालकृष्ण आडवाणी यांचे स्वर शनिवारी अचानक बदलले. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची त्यांनी भरभरून स्तुती केली. मोदी यांचे व्यवस्थापन कौशल्य हे अतिशय उत्तम असून, तेच देशाचे पुढील पंतप्रधान राहतील, असा विश्‍वासदेखील व्यक्त केला. मात्र मोदींची तुलना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत करायला नको, असेदेखील आडवाणी यांनी स्पष्ट केले. लालकृष्ण आडवाणी यांनी शनिवारी गांधीनगर लोकसभा क्षेत्रातून नामांकन पत्र दाखल केले. याअगोदर आयोजित करण्यात आलेल्या एका सभेदरम्यान ते बोलत होते. मोदींजवळ चांगले व्यवस्थापन कौशल्य आहे. ते चांगले ‘इव्हेन्ट मॅनेजर’ असून, ते प्रशासनातदेखील याचा उपयोग करतात. याच गुणाच्या बळावर ते देशाला भ्रष्टाचार, महागाई व इतर संकटांपासून मुक्त करतील, असा विश्‍वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. मोदींचे कार्यकर्त्यांना ‘अपील’ लालकृष्ण आडवाणी यांनी शनिवारी नामांकन अर्ज दाखल केला तेव्हा नरेंद्र मोदीहेदेखील त्यांच्यासमवेत होते. मोदी यांनी स्वत: निवडणूक अधिकार्‍यांकडे आडवाणींचा अर्ज सोपविला. याअगोदर मोदी यांनी सभेदरम्यान कार्यकर्त्यांना आडवाणींच्या विजयासाठी आवाहन केले. आडवाणी यांना जास्तीतजास्त मतांनी विजयी बनविण्याची कार्यकर्त्यांची जबाबदारी असल्याचे मोदी यांनी म्हटले.