Menu

देश,राजनीति
जाहीरनाम्याचे कमळ मिटलेलेच

nobanner

रविवार ६ एप्रिल २०१४ – अंतर्गत मतभेद विकोपाला : इंडिया शायनिंगच्या पुनरावृत्तीची भाजपाला धास्ती, वादग्रस्त मुद्दे टाळणार जयशंकर गुप्त / फराज अहमद – नवी दिल्ली अयोध्येतील रामजन्मभूमी, ३७0 कलम यासारख्या वादग्रस्त मुद्यांचा समावेश करावा की नाही यावरून पक्षात वरिष्ठ पातळीवर सुंदोपसुंदी सुरू असल्याने निवडणुकीतील मतदान सुरू झाले तरी, जाहीरनाम्याचा पत्ता नाही, अशी नामुष्की भारतीय जनता पार्टीवर ओढवली आहे. परिणामी सोमवारी सकाळी १११ मतदारसंघात मतदान सुरू होईल, तेव्हाही पक्षाच्या जाहीरनाम्याचे कमळ मिटलेलेच असेल. आज-उद्या करता करता अखेर सोमवारचा मुहूर्त जाहीरनाम्याच्या घोषणेसाठी नक्की करण्यात आला आहे. भाजपाचा जाहीरनामा ३ तारखेलाच जाहीर होणे अपेक्षित होते. परंतु पूर्वी अनेक निवडणुकांमध्ये प्रचारावर भर दिलेले मुद्दे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार्‍या निवडणुकीत वापरावेत की नाहीत यावर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये तीव्र मतभेद आहेत. शिवाय जोवर मोदी या जाहीरनाम्याला संमती देत नाहीत, तोवर तो जाहीर होणार नाही, अशी स्थिती आहे. त्याचे महत्वाचे कारण असे की, मोदींना स्वत:ला वादग्रस्तमुद्यांपेक्षा विकासावर भर देणारे मुद्दे हवे आहेत. त्याचवेळी डावलले जात असल्याची भावना झालेल्या मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आपण आपली ओळख गमावता कामा नये असा आग्रह धरला आहे. मात्र जाहीरनाम्याला होणारा विलंब पक्षाने गंभीरपणे घेतलेला दिसत नाही. बहुदा निवडणूक पूर्व अंदाजांनी मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला दिलेला कौल पक्षाच्या अतिआत्मविश्‍वासाचे कारण बनला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे हा अतिआत्मविश्‍वासच भाजपाला नडू शकतो. जाहीरनाम्याच्या विलंबांकडे आता त्यादृष्टीनेही पाहिले जात आहे. इंडिया शायनिंगचा जो बेसुमार प्रचार केला गेला, तो मतपेटीतून बूमरँग झाला. त्याचे स्मरण आजमितीस पक्षातील ज्येष्ठ नेते वारंवार करून देत आहेत. जाहीरनामा जेटलींच्या घरी प्रसिद्ध करणार पक्षाचा जाहीरनामा या वेळी अशोक रोडवरील मुख्य कार्यालयात नव्हे, तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांच्या घरी प्रसिद्ध करण्याचे ठरले आहे. जेटली यांचे घर ११ अशोक रोडवरील पक्ष मुख्यालयाला खेटूनच आहे. जाहीरनामा प्रसिद्ध होईल तेव्हा राजनाथसिंह, लालकृष्ण आडवाणी, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी आणि सुषमा स्वराज उपस्थित असतील. कुठे अडकला जाहीरनामा ?: आर्थिक उदारीकरण, इन्कमटॅक्सच्या सवलतींसह अन्य काही आर्थिक मुद्दय़ांवरही संसदीय मंडळात गंभीर मतभेद आहेत. एकीकडे कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासारख्या देशी कल्पना तर दुसरीकडे कॉर्पोरेट मानसिकता यांच्या कात्रीत भाजपाचा जाहीरनामा अडकला आहे. टीव्हीवर चर्चा नाही : जाहीरनामा प्रसिद्ध होणार्‍या दिवशी म्हणजे सोमवारी ईशान्य भारतात मतदान आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांद्वारे या जाहीरनाम्याला मिळणार्‍या प्रसिद्धीवर बंधन आले. त्यामुळे या जाहीरनाम्याबद्दल अधिक चर्चा होणार नाही