देश,राजनीति
निवडणुका शांततेत होण्याला प्राधान्य
रविवार ६ एप्रिल २०१४ – राकेश मारियांचे उद्गार : जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या कर्मचार्यांना सूचना मुंबई : लोकसभा निवडणूक शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्याचे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे. यालाच प्राधान्य देत असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी स्पष्ट केले. मुंबई क्राइम रिपोर्टर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या वार्तालापात मारिया बोलत होते. हा कार्यक्रम मुंबई पोलीस आयुक्तालयातील पत्रकार सदनात झाला. मुंबई पोलीस दलाकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी माझा पोलीस अधिकारी, कर्मचार्यांवर दबाव असेल, असेही त्यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले. मुंबई पोलीस दलातील तब्बल ३१ हजार अधिकारी, कर्मचारी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या कामात सहभागी आहेत. त्यांच्यावर मतदान केंद्रांची सुरक्षा, मतमोजणीपर्यंत मतपेट्यांची सुरक्षा, उमेदवारांच्या प्रचारफेर्या, जाहीर सभांचा बंदोबस्त, अचारसंहितेचे पालन होते की नाही याची काटेकोर तपासणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीत धोकादायक होतील अशा समाज घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई ही जबाबदारी पोलिसांवर आहे. सुरक्षेसाठीमुंबई पोलिसांनी यंदा राज्य राखीव पोलीस दलाच्या १९ कंपन्यांची मागणी केली होती. त्यापैकी ९ कंपन्या मंजूर करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. मंजूर ९ आणि मुंबई पोलिसांकडे असलेल्या १२ अशा २१ राज्य राखीव पोलीस दलाच्या २१ तुकड्यांचा वेढा शहरातील संवेदनशील, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या परिसरात, मतदान केंद्रांभोवती पडणार आहे. सोबत शहराबाहेरून अधिकारी-कर्मचार्यांची अधिकची तीनेक हजारांची कुमक मिळणार आहे. सुमारे सहा हजार होमगार्डसनाही निवडणुकीच्या कामात पोलिसांसोबत रस्त्यावर उतरवले जाणार आहे. मुंबई पोलिसांकडून शहरातील ९२ पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून त्या त्या हद्दीतल्या सराईत गुन्हेगारांवर विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. गुन्हेगारांसोबतच उमेदवारांवरही नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी १0८ फ्लाइंग (भरारी) व स्टॅटीक (स्थिर) पथके तयार केली आहेत. एक फौजदार आणि तीन अंमलदार असे या पथकांचे स्वरूप आहे. शहरातील ३६ साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्यांना एक भरारी व एक स्थिर पथक जोडून देण्यात आले आहे. (प्रतिनिधी) च्उमेदवारांकडून ठरलेल्या ठिकाणीच प्रचार होतोय का, वेळेचे बंधन पाळतात का, प्रचारकार्यात आचारसंहितेचे पालन होते का यावर स्थिर पथक नजर ठेवून आहे. च्दारू, पैशांचे वाटप कुठे सुरू आहे का, मतदारांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कुठे होतो आहे का, यावर भरारी पथके नजर ठेवून आहेत.