Menu

देश
भाषेविना लोकांची मने जिंकण्याची कला!

nobanner

रविवार ६ एप्रिल २०१४ – नवीन पटनाईक : उडिया येत नसूनही ओडिशाचे सत्ताकारण भुवनेश्‍वर : मला हिंदी बोलता आले असते तर वाराणशीत मी नरेंद्र मोदींविरुद्ध नक्कीच लोकसभा निवडणूक लढविली असती, अशी खंत केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी अलीकडेच एका मुलाखतीत व्यक्त केली. कुशाग्र बुद्धिमत्ता असूनही हिंदी न येण्याने त्यांचे आजवरच्या राजकीय जीवनात कधी अडले नाही. त्यांची मातृभाषा तमिळ आहे व त्या भाषेवर त्यांचे इंग्रजीएवढेच प्रभुत्व आहे. त्या जोरावर ते तामिळनाडूतून निवडून येत राहिले. पण राजकारण ही लोकांचे मन जिंकण्याची कला असली तरी त्यासाठी नेत्याला लोकांची भाषा यायलाच हवी असे मात्र नाही. शेवटी लोक व्यक्तीमधील नेतृत्त्वगुण, तळमळ आणि कामगिरी पाहूनच त्याच्याकडे विश्‍वासाने सत्तासूत्रे सोपवीत असतात, हेच खरे. काही जणांकडे भाषेविना लोकांची मने जिंकण्याची अशी कला असते. ओडिशाचे मुख्यमंत्री व बिजू जनता दलाचे सर्वेसर्वा नवीन पटनाईक हे याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. उडिया ही ओडिशाची राज्यभाषा आहे. पण स्वत:हून वाक्यरचना करून उडियामध्ये एकही वाक्य उत्स्फूर्तपणे बोलता न येणारे नवीन पटनाईक गेली सलग १४ वर्षेओडिशाचे अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. राज्यातील नागरिकांशी त्यांच्याच भाषेत बोलता न येणे ही अडचण त्यांच्या कधीही आड आली नाही. भाषा येत नसूनही नवीनबाबू लोकांशी मनाने संवाद साधतात व लोकही भाषेचा अडसर न ठेवता त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात. ओडिशातील काँग्रेसेतर राजकारणाचे अध्र्वयू व माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांच्यासारख्या पित्याकडून नवीनबाबूंना राजकीय वारसा लाभला. पण पिढीजात भाषा उडिया असूनही त्यांची या भाषेशी नाळ जुळली नाही. त्यांची आई ग्यान ही पंजाबी होती व लहानपणी संगोपनासाठी ठेवलेली दाई होती ब्रिटिश. त्यामुळे आई व दाई या दोघींकडून त्यांना लहानपणापासून इंग्रजीचेच बाळकडू मिळाले. जाहीर सभांमध्ये नवीन पटनाईक रोमन लिपीत लिहून आणलेली उडिया भाषणे वाचतात व विधानसभेतील चर्चा व प्रश्नांना अस्खलीत इंग्रजीत उत्तरे देतात. राज्यकारभाराची भाषा उडिया असली तरी स्वत: मुख्यमंत्री मात्र इंग्रजीतूनच कारभार करतात. लोकांची भाषा आपल्याला यायला हवी याची जाणीव त्यांनाही आहे. मार्च २000मध्ये सर्वप्रथम मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी उडिया शिकायला सुरुवातही केली. उडिया भाषेच्या अध्यापनाचा तब्बल ४५ वर्षांचा अनुभव असलेले प्रा. राजकिशोर मिश्रा यांची त्यांनी त्यासाठी शिकवणी लावली. दोन वर्षे हे गुरुजी पटनाईक यांच्या घरी येऊन त्यांना शिकवायचे. गुरुजी निष्णात होते व विद्यार्थीही बुद्धिमान. तरी त्यांची भाषा शिक्षणाची ही गाडी जुजबी व प्राथमिक व्याकरणाच्या पुढे काही गेली नाही. शेवटी शिकवणी तेवढय़ावरच थांबली. विद्यार्थी विद्यार्जनात अपयशी ठरला तरी मिश्रा गुरुजी त्याला ‘नापास’ न करता उलट अभिमानाने पैकीच्या पैकी गुण देतात. अपयश आपल्या पदरी घेत ते विनयाने सांगतात, वयाच्या साठीनंतर एखादी नवी भाषा अगदी पहिल्यापासून शिकण्याची ऊर्मी नसणे यात गैर काही नाही. भाषेची गोडी लावण्यात मीच कमी पडलो! पण माझा हा विद्यार्थी लोकांच्या उदंड प्रेमाने सलग १४ वर्षे मुख्यमंत्री आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. (विशेष प्रतिनिधी) निष्णात गुरुजी व बुद्धिमान विद्यार्थी एक दिवस मिश्रा गुरुजींनी नवीनबाबूंना ‘दुर्नीती’ हा शब्द त्याच्या विविध अर्थछटांसह शिकवायला घेतला. नवीनबाबूंनी डोके खाजवून आपल्या मतीनुसार या शब्दाची फोड केली- ‘दूर’ म्हणजे जवळ नसलेले किंवा काही अंतरावर असलेले आणि ‘नीती’ म्हणजे ‘तत्त्व किंवा धोरण. म्हणजेच ‘दुर्नीती’ म्हणजे तत्त्वापासून दूर गेलेले धोरण. गुरुजींनी हे उत्तर चूक ठरविले व अस्सल उडियामध्ये ‘दुर्नीती’ हा शब्द ‘भ्रष्टाचार’ या अर्थी वापरतात, असे सांगितले. या आणि अशाच शब्दांमुळे अखेर नवीनबाबूंनी उडिया शिक्षणाचा नाद सोडून दिला!

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.