Menu

खेल
विजेतेपदाची पुनरावृत्ती करणार?

nobanner

रविवार ६ एप्रिल २०१४ – ट्वेंटी-२0 वर्ल्डकप : २0११ विश्‍वचषकानंतर भारत-श्रीलंका आज पुन्हा आमने-सामने मीरपूर : विजयाच्या अश्‍वावर आरूढ झालेला भारतीय संघ उद्या, रविवारी श्रीलंकेला फायनलमध्ये धूळ चारून दोनदा ट्वेंटी-२0 वर्ल्डकप जिंकणारा पहिला संघ बनण्याच्या वज्रनिर्धाराने मैदानात पाऊल ठेवेल. आशिया खंडातील दोन तुल्यबळ प्रतिस्पध्र्यांतील हा अंतिम सामना रोमहर्षक होण्याची शक्यता आहे. टीम इंडिया टी-२0 तील दोन विजेतेपद जिंकणारा पहिला देश बनण्याच्या तयारीत आहे, तर संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीजवळ तीनदा वर्ल्ड चॅम्पियन ठरणार्‍या संघाचा कर्णधार म्हणून रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवण्याची संधी असेल. २00७ साली धोनीच्याच नेतृत्वाखालील भारताने टी-२0 वर्ल्डकप स्पर्धा जिंकली होती. सध्या भारतीय संघाला गवसलेला सूर पाहता आणि मोठय़ा स्पर्धेतील अंतिम फेरी जिंकण्याचा इतिहास पाहता भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे; परंतु वेस्ट इंडीजचा कर्णधार डॅरेन सॅमीने केलेल्या विधानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. परमेश्‍वरदेखील माहेला जयवर्धने आणि संगकारा यांना वर्ल्डकप देऊ इच्छितो, असे विधानत्याने केले होते. विजयाचे लक्ष्य कठीण असतानाही धोनी सेनेने प्रत्येक क्षणाला सुरेख खेळ केला आहे. रविचंद्रन आश्‍विननेही सर्वोत्तम कामगिरी करताना सामन्याचे पारडे आपल्याकडे झुकवले तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी फलंदाजीत गोलंदाजांचा सन्मान करतानाच कोणतीही अडचण न येऊ देता विजयात निर्णायक योगदान दिले आहे. युवा खेळाडूंच्या या कामगिरीमुळे धोनीला प्रतिकूल परिस्थितीतही फलंदाजीची फारशी संधीच मिळाली नाही. असे असले तरी भारतीय संघाचा हा कर्णधार महत्त्वाचा खेळाडू आहे. श्रीलंकन संघ आणि विशेषत: कुलसेखरा २0११ च्या वनडे वर्ल्डकप फायनलमधील वानखेडे स्टेडियमवर धोनीने मारलेला ‘हेलिकॉप्टर शॉट’ विसरलेला नसेल. दोन्ही संघ तीन वर्षे आणि तीन दिवसानंतर पुन्हा एकदा वर्ल्डकप फायनलमध्ये आमने-सामने उभे ठाकले आहेत. २00७ मध्ये हरियाणाच्या जोगिंदर शर्माने फायनलमध्ये ऐतिहासिक षटक टाकले होते. त्या वेळेसचे अनेक खेळाडू या संघातही आताही आहेत. दुसरीकडे श्रीलंकेला मोठय़ा स्पर्धेच्या फायनलमध्ये कचखाऊवृत्तीची सवय मोडावी लागेल. याआधी या संघाला २00९ आणि २0१२ मध्ये फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. परंतु यावेळी श्रीलंकेचे खेळाडू सर्वस्व पणाला लावू शकतात. (वृत्तसंस्था) प्रतिस्पर्धी संघ भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विराट कोहली, युवराजसिंग, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्‍विन, अमित मिश्रा, मोहित शर्मा, भुवनेश्‍वर कुमार, मोहंमद शमी, वरुण आरोन, स्टुअर्ट बिन्नी आणि शिखर धवन. श्रीलंका : दिनेश चांदीमल (कर्णधार), कुशल परेरा, तिलकरत्ने दिलशान, महेला जयवर्धने, कुमार संगकारा, लाहिरु थिरिमाने, अँन्जलो मॅथ्यूज, थिसारा परेरा, नुआन कुलशेखरा, लसिथ मलिंगा, सचित्रा सेनानायके, सुरंगा लकमल, रंगना हेराथ, अजंथा मेंडिस, सेकुगे प्रसन्ना. एका षटकातील एक उत्कृष्ट चेंडू विराट कोहलीला बाद करण्यासाठी पुरे आहे. आमच्या संघात असे गोलंदाज आहेत की एखादा महान फलंदाजसुद्धा त्याच्या एका चेंडूवर बाद होईल. रविवारी आमच्यापैकी एखादा गोलंदाज ही कामगिरी करेल. भारताकडे सात चांगले फलंदाज आहेत. -लसिथ मलिंगा, कर्णधार आयसीसी वर्ल्डकप ट्वेंटी-२0 विजेतेपदाचा श्रीलंकेविरुद्धचा सामना सोपा नाही; परंतु आम्ही सध्या पूर्ण बहरात आहोत आणि विजयासाठी सर्वस्व पणाला लावू. श्रीलंका एक तुल्यबळ संघ आहे. त्यांच्या विरुद्धचा सामना सोपा नाही; परंतु आमचा संघ चांगली कामगिरी करीत आहे. आमचा संघ विजयी लक्ष्याचा पाठलाग करण्यास सर्मथ आहे. -महेंद्रसिंह धोनी, कर्णधार धोनी ‘२0१४ एशियन पुरस्कारा’ने सन्मानित लंडन : आयसीसी ट्वेंटी-२0 वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचणार्‍या भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला खेळातील शानदार उपलब्धीसाठी लंडन येथे ‘२0१४ एशियन पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू रामप्रकाशने धोनीतर्फे उपस्थितांना संदेश वाचून दाखवला. धोनीने हा पुरस्कार आशिया आणि जगातील आपल्या चाहत्यांना सर्मपित केला आहे. त्याच्या नेतृत्वाखालील भारताने २00७मध्ये आयसीसी विश्‍व चषक टी-२0, २00७-0८ सीबी सिरीज, २0१0 आशिया चषक, २0११ आयसीसी विश्‍वचषक आणि २0१३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. २0१३ मध्ये धोनी तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिला कर्णधार बनला होता. भारत : पाकिस्तानविरुद्ध ७ विकेटने विजय वेस्ट इंडिजविरुद्ध ७ विकेटने विजय बांगलादेशविरुद्ध ८ विकेटने विजय ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७३ धावांनी विजय द.आफ्रिकेविरुद्ध ६ विकेटने विजयी (उपांत्य लढत) श्रीलंका : द. आफ्रिकेविरुद्ध ५ धावांनी विजयी नेदरलँडविरुद्ध ९ विकेटने विजयी इंग्लंडकडून ६ विकेटने पराभूत न्यूझीलंडविरुद्ध ५९ धावांनी विजयी वेस्ट इंडिजविरुद्ध २७ धावांनी विजयी (उपांत्य लढत) या स्पर्धेतील सर्वाधिक धावा (२0१४) : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ बाद १५९ धावा केल्या होत्या. श्रीलंकेने इंग्लंडविरुध्द ४ बाद १८९ धावा केल्या होत्या. गोलंदाजांची कामगिरी (२0१४) : आर. अश्‍विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३.२ षटकांत १९ धावांत ४ बळी. रंगना हेरथचे न्यूझीलंडविरुद्ध ३.३ षटकांत ३ धावा देऊन ५ बळी. भारताला श्रीलंकेकडून ११ मे २0१0 रोजी ग्रोस इसलेट मैदानावर ५ विकेटने पराभव पत्करावा लागला होता. शतकी खेळी : माहेला जयवर्धनेची ३ मे २0१0 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध ६४ चेंडूंत १0 चौकार व ४ षटकारांच्या साहय़ाने १00 धावांची खेळी . युवराजसिंगला टी-२0 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १000 हजार धावा पूर्ण करण्यासाठी ४३ धावांची गरज. अशी कामगिरी केल्यास एक हजार धावा पूर्ण करणारा तो १७ वा खेळाडू ठरेल.