Menu

राजनीति
‘जलयुक्त शिवार’पेक्षा ‘शिवजलक्रांती’च खरी, सेनेचा दावा

nobanner

मुंबई – 06 मे : राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेवर शिवसेनेनं आता निशाणा साधलाय. सरकारी कामांची ‘डबकी’ होतात. जलयुक्त शिवार योजनेवर आणि कार्यद्धतीवरही अनेकांनी आक्षेप घेतलाय. या योजनेच्या खर्चावरही बोललं जातंय अशी टीका सेनेनं ‘सामना’तून केलीये. तसंच आम्हाला या राजकारणात पडायचं नाही अशी भलामणही सेनेनं केलीये. याचवेळी शिवजलक्रांतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या मराठवाड्यातल्या कामाला जनतेतून मोठा प्रतिसाद दिला असा दावा सामनातून करण्यात आला. त्यामुळे सेनेने आता जलयुक्त शिवार की शिवजलक्रांती ? यावर नवा वाद उपस्थित केलाय.sena_on_jalyukat3

राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेनं राज्यभरात पाय रोवले आहे. सेलिब्रिटींपासून ते दिग्गजांपर्यंत अनेकांनी मदत करून योजनेला हातभार लावलाय. आता शिवसेनेनं जलयुक्त शिवार योजनेला आव्हान देत शिवजलक्रांतीच्या कामाचा पाढाच वाचलाय. मराठवाड्यात शिवजलक्रांती हीच खरी क्रांती आहे असा दावाच सेनेनं केलाय. बीड जिल्ह्यामध्ये शिवजलक्रांतीच्या अंतर्गत 23 गावांतील नद्या, नाले, बंधार्‌यांची कामे इथं शिवसेनेने पूर्ण केली. हे काम अवघ्या 56 लाख 25 हजार रुपयांत केले. हेच काम सरकारी यंत्रणेने केले असते तर या कामाचे अंदाजपत्रक साडेचार कोटींच्या घरात गेले असते, असं सांगत सेनेनं स्वत:ची पाठ थोपडून घेतलीये.

तर दुसरीकडे सरकारी कामांची जशी ‘डबकी’ होतात तशी कामे शिवजलक्रांतीत होणार नाहीत याची काळजीही शिवसेना घेत आहे. सरकारी पातळीवरही जलयुक्त शिवाराची कामे सुरू आहेत, पण या योजनेवर आणि तिच्या एकूणच कार्यपद्धतीबद्दल तज्ज्ञांपासून सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांपर्यंत अनेक जण आक्षेप घेत आहेत. खर्चाच्या आकडेवारीबद्दलही बरंच काही बोललं जात आहे अशी टीका करत मात्र आम्हाला या राजकारणात आम्हाला पडायचे नाही अशी पळवाटही काढलीये.

तसंच शिवजलक्रांतीच्या माध्यमातून शिवसेना मराठवाड्यात जे काम उभे करते आहे त्याला जनतेमधून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आहे. दुष्काळग्रस्त भागात आम्ही स्वत: फिरलो. शिवजलक्रांती योजनेला लोकांचा मिळणारा उदंड प्रतिसाद डोळ्यांनी बघितला. सरकारवर अवलंबून न राहता ही कामे उभी राहत आहेत. सरकारची मदत न घेता जे काम उभे राहते ती खरी क्रांती अशी भलामणही सेनेनं केली.

तसंच सरकारनेही शिवसेनेच्या या शिवजलक्रांती योजनेतील कामांचा अभ्यास करायला हवा असा सल्ला देत ही लढाई श्रेयाची नाही असंही सेनेनं ‘सामना’तून म्हटलंय.