खेल
IPL च्या विजेतेपदासाठी बंगळुरु विरुद्ध हैदराबाद महामुकाबला
IPL च्या विजेतेपदासाठी बंगळुरु विरुद्ध हैदराबाद महामुकाबला
मुंबई : आयपीएलची ट्रॉफी विराट कोहली जिंकणार की डेव्हिड वॉर्नर? या प्रश्नाचं उत्तर आता काही तासांतच मिळणार आहे. आज आयपीएलच्या फायनलमध्ये बंगळुरु आणि हैदराबादच्या संघांमधली लढाई रंगणार आहे.
विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि डेव्हिड वॉर्नरची सनरायझर्स हैदराबाद या संघांमधल्या फायनलचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे उभय संघांना आजवर एकदाही विजेतेपद पटकावता आलेलं नाही.
बंगळुरुने 2009 आणि 2011 साली आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली होती. पण विराटच्या फौजेला दोन्ही वेळा उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं. अॅडम गिलख्रिस्टच्या डेक्कन चार्जर्सनं 2009 आयपीएलच्या विजेतेपदावर हैदराबादचं नाव कोरलं होतं. पण हैदराबाद ही सनरायझर्सची फ्रँचाईझी झाल्यापासून 2013 साली मिळवलेलं प्ले ऑफचं तिकीट हीच त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे.
आयपीएलच्या फायनलचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे नवव्या मोसमाच्या विजेतेपदाची अंतिम लढाई बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणारय. त्यामुळे अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या फौजेचं पारडं तुलनेत जड मानण्यात येतंय.
बंगळुरु आणि हैदराबाद या संघांमधला समान दुवा म्हणजे दोन्ही फौजांची मदार ही प्रामुख्यानं त्यांच्या सेनापतीच्या म्हणजे कर्णधारांच्या खांद्यावर आहे. पहिल्या सात सामन्यांमध्ये केवळ दोन विजय मिळवणारा बंगळुरुचा संघ यंदाच्या मोसमात अक्षरश: गटांगळ्या खात होता. पण पुढच्या सात सामन्यांमध्ये सहा विजय मिळवून त्यांनी गुणतालिकेत दुसरं स्थान राखलं आणि मग क्वालिफायर वन सामन्यात त्यांनी बलाढ्य गुजरात लायन्सचा धुव्वा उडवून फायनलचं तिकीटही मिळवलं.
बंगळुरुच्या या कामगिरीत मोलाचा वाटा आहे तो कर्णधार विराट कोहलीचा. विराटनं 15 सामन्यांमध्ये चार शतकं आणि सहा अर्धशतकांसह 919 धावांचा रतीब घातला आहे. यंदाच्या मोसमातली त्याची सरासरी आहे 83.54. ही कामगिरी पाहता विराट बंगलोरला आपल्या खांद्यावरून फायनलमध्ये घेऊन गेलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
बंगळुरुच्या कामगिरीत जी भूमिका विराट कोहलीनं बजावली, तीच भूमिका हैदराबादसाठी त्यांचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनं बजावलीय. वॉर्नरनं यंदाच्या मोसमातल्या 16 सामन्यांमध्ये 59.92च्या सरासरीनं 779 धावा फटकावल्या आहेत. त्यात आठ अर्धशतकांचा समावेश आहे.
वॉर्नरच्या कामगिरीतलं हे सातत्य त्याच्या हैदराबादच्या कामगिरीतही दिसून आलं. याच सातत्यामुळे हैदराबादची फौज प्ले ऑफच्या शर्यतीतून कधीच बाहेर गेली नाही. चौदापैकी आठ साखळी सामने जिंकून हैदराबादनं गुणतालिकेत तिसरं स्थान मिळवलं. त्याच हैदराबादनं मग एलिमिनेटर आणि क्वालिफायर टू सामन्यांमध्ये अनुक्रमे कोलकाता आणि गुजरातसारख्या बलाढ्य फौजांना पराभवाची कटू चव चाखायला लावली. या कामगिरीनं त्यांना फायनलचं तिकीट मिळवून दिलं.
बंगळुरु आणि हैदराबादच्या फौजा फायनलच्या रणांगणात आमनेसामने येण्याआधी, त्यांनी साखळीत एकमेकांशी दोनदा हात केलेयत.
यंदाच्या साखळीत बंगळुरुतला सामना हा बंगळुरुने, तर हैदराबादमधला सामना हा सनरायझर्सनं जिंकला होता. या दोन सामन्यांमधलं आणखी एक साम्य म्हणजे विजयी संघानं पहिली फलंदाजी करुन मोठी धावसंख्या उभी केली होती. आणि मग त्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या दबावाखाली प्रतिस्पर्धी संघ कोलमडला होता.
आता फायनलच्या निमित्तानं बंगळुरु आणि हैदराबाद यंदाच्या मोसमात तिसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. साखळी सामन्यांमधला अनुभव आणि फायनलचं वाढलेलं दडपण लक्षात घेता, हे दोन्ही संघ लक्ष्याचा पाठलाग करण्याऐवजी पहिली फलंदाजी करण्याला पसंती देऊ शकतात. त्यामुळं फायनलच्या रणांगणात टॉस निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.