Menu

संकटकाळी लोकलच्या महिला डब्यातून थेट गार्डशी संपर्क

मुंबईच्या लोकल रेल्वेतील प्रवास महिलांसाठी सुरक्षित करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनातर्फे दिवसेंदिवस प्रयत्न केले जात आहेत. पॅनिक बटण तितकंसं प्रभावी ठरत नसल्याचं समोर आल्यानंतर ते हटवण्याचा विचार सुरु झाला. त्यानंतर महिला प्रवाशांना आपत्कालीन ​स्थितीत थेट लोकलच्या गार्डशी संपर्क साधण्याची सुविधा पश्चिम रेल्वे पुरवणार आहे.

लोकलमधील महिलांसाठी आरक्षित डब्यात वॉकी-टॉकी सदृश्य सुविधा असलेल्या ‘परे’च्या दोन लोकल लवकरच सेवेत येणार आहेत. गार्डशी संपर्क करण्याच्या या सुविधेसाठी साधारण 25 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

महिलांच्या डब्यात दरवाजाजवळ मायक्रोफोन बसवण्यात येणार आहे. त्यावरील बटण दाबताच तात्काळ गार्डशी संवाद साधता येईल. या यंत्रणेतून महिला प्रवासी आणि गार्डना वॉकी-टॉकीप्रमाणे थेट बोलता येईल. हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर इतर लोकलमध्येही तिचा समावेश केला जाणार आहे.

या यंत्रणेद्वारे गार्डला महिलांच्या डब्यातील परिस्थितीची माहिती मिळताच पुढील कारवाईसाठी वेळ मिळेल. लोकल पुढील स्टेशनवर थांबवावी की तात्काळ याची सूचना मोटरमनला देणंही गार्डला शक्य होणार आहे. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणेचा दुरुपयोग करण्याच्या वृत्तीवर नियंत्रण येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.