देश
कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी टोलमाफी नव्हे तर टोल सवलत
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी नव्हे तर टोलसवलत देण्यात आली आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरुन कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना ही टोलसवलत देण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
“गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन वळवण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील संबंधित टोल ठेकेदारांनी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी टोलमधून सवलत द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत”, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं. तसंच कोकणात जाणाऱ्या गाड्यांसाठी खास स्टिकर्स देण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांमध्ये गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. मात्र सरसकट सर्वच वाहनांना टोलमाफी देणं शक्य नाही, तर केवळ कोकणात जाण्यासाठी वळवण्यात आलेल्या वाहतुकीला टोलसवलत देण्यात येईल, असं केसरकर म्हणाले.
सरकार कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षेचा विचार करत आहे. गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. त्यामुळे ही वाहतूक मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरुन वळवण्यात आली आहे, असं केसरकरांनी सांगितलं.