Menu

देश
आत्महत्या नको होऊ दे, शेतकऱ्यांच्या मुलांचं बाप्पाला साकडं

nobanner

नाशिक, 06 सप्टेंबर : त्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमात आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांनी गणेशाची प्रतिष्ठापना केलीये. आधारतीर्थ आश्रमात आत्महत्या केलेल्या शेतक-यांची मुलं आहेत. या मुलांनी बाप्पाची वाजतगाजत मिरवणूक काढली. कोणत्याही शेतक-याची ‘आत्महत्या नको होऊ दे’ असं साकडं या मुलांनी बाप्पाला घातलंय. आश्रमातल्या निराधार मुलांना आईवडिल नाहीत, नातेवाईक नाहीत पण या मुलांची बाप्पावर नितांत श्रद्धा आहे.nsk_adhar_Shram

गोदावरी नदीसह 5 नद्यांचा उगम होणाऱ्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे आधारतीर्थ आधार आश्रम. कर्जबाजारी,सावकारी पाश,उद्‌ध्वस्त झालेली पिकं, कापणीला आलं असतानाच निसर्गाच्या फटक्यानं उद्‌ध्वस्त झालेलं पीक… अशा एक ना अनेक कारणांनी मृत्यूला जवळ करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नीराधार मुलांचा आधार झालेला हा आश्रम. दुःख काय असतं हे न कळण्याच्या वयातील या लहान मुलांना या आश्रमात जगण्यासाठी पुन्हा उभं करताय. यातील कोणाला बाप नाही तर कोणाला आई नाही, नातेवाईकांचाही आधार नाही. पण बाप्पावर यांची मात्र नितांत श्रद्धा. श्रीगणेशाला अगदी वाजत-गाजत हे घेऊन निघालेय.

या सगळ्यांना वाटतंय की, गणराया हा खरा विघ्नहर्ता. याला सगळ्यांचं दुःख समजतं. मग तरीही आपल्या वडिलांनी आत्महत्या का केली ? या प्रश्नाचं उत्तर काही त्यांना मिळत नाही. यांच्या डोक्यावर घातलेल्या टोप्यांवर असलेला हा संदेश त्यामुळंच फार बोलका वाटतो.

या आधाराश्रमात मोठ्या श्रद्धेनं ही मुलं दरवर्षी गणपती बसवतात. बाप्पाला साकडं घालतात पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबत नाही. देवाच्या रूपानं,सरकारनं शेतकऱ्यांचा आधार व्हावा, एवढीच आहे या मुलांची माफक अपेक्षा..