राजनीति
मुंडे-भुजबळ भेटीनंतर नाशिकमधील ओबीसी राजकारणाला वेग
Pankaja Munde and Chhagan Bhujbal : पंकजा मुंडे यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले असले तरी आजच्या घडामोडींमुळे या भेटीचे राजकीय संदर्भ पुढे येताना दिसत आहेत.
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी काल आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तुरूंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात महत्त्वपूर्ण राजकीय समीकरणे उदयास येत असल्याचे चित्र आहे. छगन भुजबळ यांचे विश्वासू साथीदार समजले जाणारे दिलीप खैरे यांनी गुरूवारी सकाळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते यांची भेट घेतली. आजपर्यंत दिलीप खैरे आणि वसंत गीते हे एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी होते. त्यामुळे या दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सध्या राज्यभरात निघत असलेल्या मराठा मोर्चांना प्रत्युत्तर म्हणून नाशिकमध्ये ओबीसी मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या ३ ऑक्टोबरला नाशिकमध्ये हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी दिलीप खैरे आणि वसंत गीते एकत्र आले होते. कालच पंकजा मुंडे यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. या भेटीच्या पार्श्वभूमीवर दिलीप खैरे आणि वसंत गीते यांच्या एकत्र येण्याकडे सूचकपणे पाहिले जात आहे. यानिमित्ताने राज्यातील ओबीसी चळवळ भक्कम करण्याबरोबरच भुजबळ यांच्या समर्थकांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आता रंगली आहे. ही नवी राजकीय समीकरणे नाशिकमधील आगामी पालिका निवडणुकांवर प्रभाव टाकू शकतात.
पंकजा मुंडे यांची भुजबळांशी चर्चा
छगन भुजबळ आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याकडे आजपर्यंत नेहमीच राज्यातील ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून पाहिले गेले. यापैकी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे त्यांची राजकीय गादी पंकजा मुंडे यांच्याकडे आली आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन छगन भुजबळांची भेट घेतल्यापासून राजकीय चर्चांना उधाण आले होते. पंकजा मुंडे यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले असले तरी आजच्या घडामोडींमुळे या भेटीचे राजकीय संदर्भ पुढे येताना दिसत आहेत. एकनाथ खडसे हेही बुधवारी रात्री किंवा गुरुवारी भुजबळ यांची भेट घेणार आहेत. भुजबळ हे ओबीसी समाजातील मातब्बर नेते असून पंकजा मुंडे व खडसे हेही ओबीसी समाजाचे नेते आहेत. मराठा समाजाचे मोठे मोर्चे निघत असून आरक्षणाची मागणी होत आहे. त्यांचा समावेश ओबीसीमध्ये केला गेल्यास कोणती भूमिका घ्यायची, असा प्रश्न ओबीसी नेत्यांपुढे आहे. याच कारणामुळे ओबीसी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपचे नेते भुजबळ यांना भेटत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. भुजबळ यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यापासून अंतर राखले आहे