देश
आयुक्त तुकाराम मुंढेंवर थोड्याच वेळात अविश्वास ठराव
नवी मुंबई महापालिकेत थोड्याच वेळात आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे.
अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी अनिश्चित काळासाठी सुट्टी घेतल्याची चर्चा आज नवी मुंबईमध्ये होती. पण सकाळी साडे नऊ वाजताच कार्यालयात दाखल होत तुकाराम मुंढे यांनी या अविश्वास ठरावाला सामोरे जाणार असल्याचं सूचित केलं.
आजच्या अविश्वास ठरावाबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी आग्रही आहे, शिवेसेनेचे काही नगरसेवकही या अविश्वासाच्या बाजूनं आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांनी अद्याप याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही.
तुकाराम मुंढेंवरील आरोप
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर महापौर, नगरसेवक, लोकप्रतिनिधींचा अवमान करणे, महासभेत धोरणात्मक प्रस्ताव न आणता परस्पर निर्णय घेणे, स्थायी समितीच्या निर्णयावर गदा आणणे, आदी आरोप ठेवण्यात आले आहेत.
असं असलं तरी सर्वसामान्य मुंबईकर मात्र तुकाराम मुंढे यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत.नवी मुंबईकरांनी मुंढेंना वाचवण्यासाठी ‘सेव्ह तुकाराम मुंढे’ मोहीम सुरु केली आहे. वाशी रेल्वे स्थानकाजवळ नवी मुंबईकरांनी एकत्रित येऊन ‘वॉक फॉर आयुक्त’ हे अभियान राबवलं गेलं. यावेळी ‘संडे हो या मंडे, आयुक्त हवेत मुंढे’ असे फलक हाती घेऊन, तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या. त्यामुळे वादामध्ये कुणाची सरशी होणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल.