राजनीति
नगरपालिकांमध्ये वर्चस्वासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस
राज्यातील नगरपालिका- नगरपंचायती निवडणुकांच्या मतमोजणीत दुपारपर्यंत पिछाडीवर असलेल्या भाजपने अचानकपणे मुसंडी मारून आघाडी घेतली आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली तेव्हा भाजप चौथ्या स्थानावर फेकली गेली होती. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अभुतपूर्व यश मिळविणाऱ्या भाजपचा जोर ओसरला, अशा छापाच्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत होत्या. एका बाजूला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप सुरूवातीपासूनच अन्य पक्षांपेक्षा सरस ठरत असताना प्रत्यक्षात नगरपालिका हातातून निसटत असल्यामुळे भाजपच्या गोटात काहीसे चिंतेच वातावरण निर्माण झाले होते. सुरूवातीच्या ५७ जागांचे निकाल हाती आले तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अनुक्रमे १५ व १४ तर शिवसेनेने १२ नगरपालिकांमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे भाजप थेट चौथ्या स्थानावर फेकला गेला होता. मात्र, त्यानंतरच्या मतमोजणीत मुसंडी मारत भाजपने थेट पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. आतापर्यंत साधारण ११० नगरपालिकांचे कल हाती आले असून त्यामध्ये भाजपला सर्वाधिक २२, काँग्रेसला २०, राष्ट्रवादी १७ आणि शिवसेनेला १४ नगरपालिकांची सत्ता मिळाली आहे. तर यंदापासून नगराध्यक्षपदासाठी सुरू करण्यात आलेल्या थेट मतदानप्रक्रियेचाही भाजपला मोठा फायदा झाला आहे. राज्यातील ३५ नगरपालिकांवर भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्याखालोखाल शिवसेनेचे २२, काँग्रेसचे २१, राष्ट्रवादीचे १३ तर २५ अपक्ष उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. मतमोजणीच्या सुरूवातीच्या काळात भाजपच्या पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, बबन लोणीकर यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या नगरपालिकांमध्ये भाजपचा पराभव झाला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहणार, असे वाटू लागले होते. परंतु भाजपने या शर्यतीत अनपेक्षितपणे पुनरागमन केले आहे.
दरम्यान, आजच्या निकालांमध्ये कोकणात राणे कुटुंबियांनी केलेले जोरदार कमबॅक लक्ष वेधून घेताना दिसत आहे. कोकणातील सावंतवाडी, देवगड आणि दापोलीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. गेल्या निवडणुकीत सावंतवाडी नगरपरिषदेत राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या दीपक केसरकर यांनी सर्व १७ जागा जिंकल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसने राणे यांच्या नेतृत्त्वाखाली ८जागा मिळवल्या. शिवसेनेला याठिकाणी ७ जागा मिळाल्या असल्या तरी हा निकाल एकप्रकारे दीपक केसरकर यांच्या वर्चस्वाला बसलेला धक्का मानला जात आहे. याशिवाय, देवगड नगरपालिकेत काँग्रेसने १७ पैकी १० जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे हे निकाल म्हणजे नारायण राणे यांनी कोकणातील राजकारणात जोरदार पुनरागमन केल्याचे दर्शविणारे आहेत. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीचा फटका बसताना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपालिकांपैकी ४ ठिकाणी आतापर्यंत शिवसेनेचा भगवा फडकला आहे. बहुतांश नगरपालिकेत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या चौरंगी लढतीत सेनेने निर्विवाद यश मिळवले आहे. यापैकी मनमाड नगरपालिकेत शिवसेनेला १९ तर राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या ४ जागांवर विजय मिळवता आला आहे. याशिवाय, नांदगाव, सिन्नर आणि भगूरमध्येही शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे. छगन भुजबळ यांचे वर्चस्व असलेल्या नांदगाव नगरपालिकेत शिवसेनेने ११ जागा जिंकल्या असून त्याजागी सेनेचा नगराध्यक्षही निवडून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला याठिकाणी फक्त ४ जागा जिंकता आल्या आहेत. हा निकाल छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यातील वर्चस्वाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत आतापर्यंत प्रभावी ठरत आलेला मनसे फॅक्टरही पूर्णपणे निष्प्रभ ठरला आहे. याचा मोठा फायदा शिवसेनेला मिळताना दिसत आहे.
सत्तांतरानंतर एवढय़ा मोठय़ा संख्येने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्याची सत्ताधारी भाजप व शिवसेनेवर ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळेच राज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थामधूनही दोन्ही काँग्रेसला हद्दपार करण्याच्या इराद्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी गेले काही दिवस प्रचारसभांचा धडाका लावला होता. तर निदान स्थानिक संस्थांमधील आपले राजकीय वर्चस्व टिकविण्यासाठी दोन्ही काँग्रेसने आपली ताकद पणास लावली आहे. याशिवाय, या निवडणुकांच्या निमित्ताने अनेक दिग्गजांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. त्यामुळे जनतेचा अंतिम कौल काय, असेल याकडे भाजपसह अन्य राजकीय पक्षांचे डोळे लागले आहेत.