Menu

मनोरंजन
नाना पाटेकर यांचा आगामी चित्रपट ‘नेशन फर्स्ट’

nobanner

तात्यासाहेब शिरवाडकरांच्या प्रभावी लेखणीतून उतरलेल्या ‘नटसम्राट’ नाटकाने गेली कित्येक वर्ष रंगभूमीवरच्या प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. अभिजात कलाकृतीचे बिरुद मिरवणारे हे नाटक या वर्षाच्या सुरुवातीलाच रुपेरी पडद्यावर अवतरले आणि नाना पाटेकर यांनी साकारलेल्या नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकरांना प्रेक्षकांकडूनही तितकाच उदंड प्रतिसाद मिळाला. नाना पाटेकर यांना रंगभूमीवरची व्यक्तिरेखा मोठय़ा पडद्यावर साकारताना पाहण्यासाठी आणि त्यांच्या खास शैलीतील संवाद ऐकण्याच्या उत्सुकतेपोटीही अनेक अमराठी प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिलेला. ‘नटसम्राट’ हा चित्रपट नाना पाटेकरांच्या अभिनयापासून सगळ्याच गोष्टींमध्ये सरस होता. दिग्दर्शक, अभिनेता महेश मांजरेकर याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर आता नाना आणि महेश यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे.

अभिनेता नाना पाटेकर आणि दिग्दर्शक महेश मांजेरकर ही जोडी लवकरच नव्या चित्रपटासाठी एकत्र येत आहे. गोव्यात झालेल्या ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान नानांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. नाना पाटेकर म्हणाले की, आम्ही लवकरच आमच्या नव्या चित्रपटाच्या कामाला सुरुवात करणार आहोत. या चित्रपटाचे शीर्षक ‘नेशन फर्स्ट’ असे असेल. आम्हाला उत्तम कथा मिळाली असून पुढील वर्षी हा चित्रपट ‘इफ्फी’मध्ये दाखविण्यात आला तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. विशेष म्हणजे या चित्रपटात एकही गाणे असणार नाही. तसेच हा चित्रपट केवळ १०० मिनिटांचा असेल. याबाबत बोलताना ते म्हणाले की, तीन तासांचा चित्रपट बनविण्याची मला गरज वाटत नाही. तुम्ही कमी वेळातही कथा सांगू शकता.

गोव्यात झालेल्या या महोत्सवात इंडियन पॅनोरमा, आंतरराष्ट्रीय विभाग, भारतीय आणि विदेशी चित्रपटांचे सिंहावलोकन अशा विविध विभागांतर्गत देशविदेशातील चित्रपट दाखवण्यात आले. यात ‘इंडियन पॅनोरमा’ विभागांतर्गत चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ चित्रपटाबरोबर ‘कटय़ार काळजात घुसली’ या संगीत नाटकावर बेतलेला त्याच नावाचा चित्रपट, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘द सायलेन्स’, सुहास भोसले दिग्दर्शित ‘कोती’ असे चार मराठी चित्रपट दाखवण्यात आले. मराठी चित्रपटांची या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील गेल्या काही वर्षांतील उपस्थिती लक्षणीय ठरली आहे.