देश
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नोटाबंदीवर बोलणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी राज्यसभेतील चर्चेसाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी मोदी नोटांबदीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांना उत्तर देण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून विरोधकांनी पंतप्रधानांनी संसदेत येऊन नोटाबंदीवर बोलावे, अशी मागणी लावून धरली आहे. या प्रमुख मागणीसाठी विरोधकांनी गेल्या गुरुवारपासून दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज होऊ दिलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा तिढा सोडविण्यासाठी सरकारने मागच्या दाराने विरोधकांशी चर्चा सुरू केली आहे. संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी विरोधकांशी चर्चाही केली आहे. दरम्यान, मोदींच्या उपस्थितीमुळे आज राज्यसभेत काय घडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मोदींच्या उपस्थितीमुळे आज राज्यसभेत काय घडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नरेंद्र मोदींनी राज्यसभेतील चर्चेत विरोधकांना सडेतोड उत्तर दिल्यास अधिवेशनातील विरोधकांचे हुकमी अस्त्र निष्प्रभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने हा तिढा निकालात काढण्याचा प्रस्ताव ठेवल्यास काय करायचे, हे ठरविण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, विरोधक आजदेखील सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा विरोध करणार असल्याचे समजते.
तत्पूर्वी बुधवारी नोटाबंदीविरोधात विरोधी पक्षांच्या सुमारे दोनशे खासदारांनी संसदेच्या आवारातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून संसदेच्या दोन्ही सभागृहांकडे न फिरकलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी लोकसभेमध्ये पोहोचले. तरीसुद्धा गोंधळ न थांबल्याने काही मिनिटांमध्ये लोकसभेचे कामकाज थांबवावे लागले होते. मोदींनी सभागृहात यावे, या प्रमुख मागणीसाठी विरोधकांनी गेल्या गुरुवारपासून दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज होऊ दिलेले नाही. दुसरीकडे सत्तारूढ पक्षानेही पंतप्रधानांच्या उपस्थितीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. पंतप्रधानांनी राज्यसभेत येऊन नोटाबंदीवरील चर्चेला उत्तर द्यावे आणि लोकसभेत मतविभाजनाच्या नियम ५६ अन्वये सरकारने चर्चेला सामोरे जावे, तसेच नोटाबंदीच्या निर्णयाची पूर्वकल्पना दिल्यामुळे झालेल्या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागण्या विरोधकांनी ठामपणे लावून धरल्या आहेत. दरम्यान, नोटाबंदीवर जनमत जाणून घेण्यासाठी सुरू केलेल्या अॅपवर आतापर्यंत पाच लाख लोकांनी मते व्यक्त केली असून ९३ टक्के जनतेने या निर्णयाचे समर्थन केल्याचा दावा सरकारने केला आहे. भ्रष्टाचार व काळ्या पैशाविरोधात लढाई आवश्यक असल्याचे मत ९९ टक्के लोकांनी नोंदवले आहे. ९० टक्के लोकांनी सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. ९२ टक्के लोकांनी भ्रष्टाचारविरोधात मोदी सरकारचे प्रयत्न योग्य असल्याचे म्हटले आहे. ९० टक्के लोकांनी ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. तर ९२ टक्के लोकांच्या मते या निर्णयामुळे काळे धन, भ्रष्टाचार आणि दहशतवादावर लगाम लावण्यास मदत मिळेल असे म्हटले आहे. या सर्वेक्षणात ५०० व १००० रूपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यासंबंधीचे प्रश्न विचारण्यात आले होते.