Menu

अपराध समाचार
पुण्याजवळ गाडीत सापडली २६ कोटींची रोख रक्कम

nobanner

पुण्याजवळील लोणीकंदमध्ये पोलिसांनी २६ कोटींची रक्कम ताब्यात घेतली आहे. तवेरा गाडीमधून ही रक्कम जालन्याहून पुण्याला नेली जात होती. एका गाडीतून मोठी रक्कम पुण्याला नेली जात असल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी ही गाडी अडवून रोख रक्कम ताब्यात घेतली. सध्या या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

जालन्याहून पुण्याला जात असलेल्या या गाडीतील रक्कम महाराष्ट्र ग्रामीण बँकेची असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. गाडीच्या चालकाकडून ही माहिती पोलिसांना मिळाली आहे. गाडीत २६ कोटी रुपयांची रोख रक्कम आहे. ही सर्व रक्कम पाचशे आणि हजारांच्या नोटांमधील आहे. चालकाची प्राथमिक चौकशी केल्यावर पोलिसांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना अधिक चौकशीसाठी बोलावले आहे. यानंतर पोलिसांकडून या प्रकरणात पुढील कारवाई करण्यात येईल.
याआधी निफाडमध्ये गुरुवारी सकाळी नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी दोन गाड्यांमधून ७३ लाखांच्या नोटा जप्त केल्या आहेत. नाशिकहून कोपरगावला जाणाऱ्या गाडीत पोलिसांना ३३ लाखांची रोख रक्कम सापडली. तर गुजरातहून वैजापूरला जाणाऱ्या दुसऱ्या गाडीत पोलिसांना ४० लाख रुपये आढळले.

मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या या दोन्ही गाड्यांमधील लोकांना रोख रकमेबद्दल कोणताही खुलासा करता आलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण पुढील तपासासाठी आयकर विभागाकडे पाठवले आहे. या दोन्ही गाड्या अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येते आहे.