देश
पोलिसांचे आदेश धुडकावून पेटते दिवे आकाशात!
दिवाळीत आकाशात सोडण्यात येणाऱ्या पेटत्या आकाशदिव्यांमुळे (फ्लाईंग लँटर्न ) दुर्घटना घडल्याच्या पाश्र्वभूमीवर पुणे पोलिसांनी यंदा आकाशदिवे सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, पोलिसांचे आदेश धुडकावून अनेकांनी आकाशदिवे सोडले. पोलिसांनी कारवाईचा दम देऊनही आकाशदिवे सोडण्याची ‘स्पर्धा’ शहरातील विविध पुलांवर लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दिवाळीत आकाशदिवे सोडल्यामुळे आग लागण्याच्या घटना घडतात. आकाशदिवे सोडल्यानंतर पुन्हा ते जमिनीच्या दिशेने येतात. पेटते दिवे छतावर ठेवलेल्या अडगळीच्या सामनावर तसेच झाडांवर पडतात. त्यामुळे आग लागते. यंदाच्या वर्षी आकाशदिवे सोडण्यावर बंदी घालण्याचे आदेश मुंबई आणि पुणे पोलिसांनी दिले. पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी नागरिकांना आवाहनही केले. आकाशदिवे सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. पोलिसांचे आदेश २६ नोव्हेंबपर्यंत लागू राहणार आहेत.
पोलिसांनी आदेश देऊनसुद्धा शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल, एस. एम. जोशी पूल, राजाराम पूल येथे आकाशदिवे सोडण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. आकाशदिवे सोडण्यावर बंदी घालण्यात आल्याचे अनेकांना माहितदेखील नव्हते. लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या दिवशी शहरातील विविध पुलांवर आलेल्या नागरिकांनी आकाशदिवे सोडले. आकाशदिव्यांबरोबरच पुलावर थांबलेल्या टोळक्यांकडून आकाशात सोडले जाणारे बाण आणण्यात आले होते. अनेकांनी हातात बाण धरून ते सोडले. पुलावर फटाक्यांच्या माळा लावण्यात आल्यामुळे वाहनचालक तसेच तेथून निघालेल्या ज्येष्ठांना त्रास झाला. पुलावर सुरू असलेल्या उच्छादामुळे अनेकांना त्रास झाला. मध्य भागातील काही चौकात थांबलेल्या टोळक्याने आकाशदिवे सोडले.
बंदी घालूनही आकाशदिव्यांची विक्री
आकाशदिव्यांची विक्री करण्यावर पोलिसांनी बंदी घातली होती. शहरातील अनेक फटाका विक्रेत्यांकडे आकाशदिवे विक्रीसाठी उपलब्ध होते. एका आकाशदिव्यांची किंमत शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत होती. फटाका विक्रेत्यांनी पोलिसांचे आदेश झुगरून आकाशदिव्यांची विक्री केली. दिव्यांची विक्री तसेच आकाशात दिवे सोडल्यास भादंवि १८८ नुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, असा इशारा पोलीस आयुक्त शुक्ला यांनी दिला होता.
पोलिसांची फक्त तंबी; कारवाई मात्र नाही
आकाशदिवे सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची तंबी पोलिसांनी दिली. मात्र, पोलिसांनी शहरातील पुलावर आकाशदिवे सोडण्यासाठी जमलेल्या टोळक्यावर कारवाई केली नाही. पुलावर सुरू असलेल्या उच्छादाकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. आकाशदिवे सोडणाऱ्यांवर कारवाई केली नाही. कारवाई झाली असती तर आकाशदिवे सोडणाऱ्यांवर जरब बसली असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (३० ऑक्टोबर) शहरातील वेगवेगळ्या भागात पंधरा ठिकाणी आग लागल्याची घटना घडली होती. आग आटोक्यात आणणाऱ्या जवानांची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धावपळ उडाली होती.