खेल
विराटप्रेमी चिमुकल्याचा कव्हर ड्राइव्ह पाहण्यासाठी दिल्लीत जमते गर्दी!
क्रिकेटचे वेड आपल्याकडे नवीन नाही. त्यातही क्रिकेटमध्ये बहुतांश जणांना फलंदाजी करणे किंवा पाहणे अधिक पसंद आहे. मग यामध्ये सध्या कुणाला विराट कोहलीची फलंदाजी पाहणे आवडते तर कुणाला आजही मास्टर ब्लास्टर सचिनचा कव्हर ड्राईव्ह युट्यूबर पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो. क्रिकेटचे वेड असणाऱ्यामध्ये सध्या विराटच्या पावलावर पाऊल ठेवण्याची इच्छा बाळगणाऱ्या दिल्लीतील चिमकुल्याचा सराव करतानाचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे..
चार वर्षांचा चिमुकला पायात पॅड आणि डोक्यात हेल्मेट घालून अशा तोऱ्यात मैदानात येतो की, या चिमुकल्याचा सराव पाहण्यासाठी दिल्लीच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर गर्दी जमते. दिल्लीतील शायान जमाल आपल्या ४० वर्षीय वडिलांसोबत या मैदानात नियमित सराव करतो. भारतीय गोलंदाज इशांत शर्मा, माजी क्रिकेटर चेतन शर्मा आणि उद्यमुख युवा ईशान किशन यांनी देखील शायानच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे. भारतीय दिग्गजांकडून कौतुकास पात्र ठरलेल्या शायानला विराट कोहलीची फलंदाजी आवडते. शायानचे विराट प्रेम इतके अफाट आहे की, आयपीएलच्या सामन्यामध्ये विराटच्या नेतृत्वाखाली बंगलोर रॉयल चॅलेंजर्सला पराभव पत्कारावा लागल्यानंतर शायानला अश्रू अनावर झाले होते.
शायानच्या वडिलांना काही दिवसापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षे दहा महिन्यांचा असताना शायनला त्यांनी पहिल्यांदा ६० दिवसांच्या सरावासाठी मैदानात उतरवले होते. यामध्ये त्यांनी शायानची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची चाचपणी केली. यावेळी त्याच्या वडिलांच्या लक्षात आले की, शायान अडीच ते तीन तास मैदानात खेळून देखील त्याला थकवा जाणवत नाही.
अवघ्या दोन वर्षाचा असताना क्रिकेटच्या मैदानात उतरणाऱ्या शायनला कव्हर ड्राइव्ह आणि स्टेट ड्राईव्ह खेळणे अधिक पसंत आहे. शायनच्या खेळाचा प्रभाव इतका आहे की, त्याला चौदावर्षाखालील संघातून खेळण्याचा प्रस्ताव देखील मिळाला होता. त्याच्या खेळातील आवड लक्षात घेऊन भविष्यात पैशामुळे त्याचा खेळ थांबू नये म्हणून त्याचे वडिल अर्शद जमाल आतापासूनच पैशाची बचत करत आहेत.