खेल
अँडरसनवर दिग्गजांकडून टीका
भारतीय वातावरणाचा पुरेपूर फायदा उचलत विराट कोहली धावांची शिखरे उभारतो आहे, असे मत व्यक्त करणाऱ्या जेम्स अँडरसनवर भारताचे माजी कर्णधार कपिल देव, माजी प्रशिक्षक मदनलाल आणि पाकिस्तानच्या निवड समितीचे प्रमुख इन्झमाम उल हक यांनी कडक शब्दांत टीका केली आहे.
विराटसारखा गुणी क्रिकेटपटू अद्याप माझ्या पाहण्यात आला नसून, तो कोणत्याही वातावरणात धावा करू शकतो, असे प्रशस्तिपत्रक कपिल यांनी दिले आहे. तर विराटच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याआधी अँडरसनने भारतात बळी घेऊन दाखवावेत, असे आवाहन इन्झमाम यांनी केले आहे.
भारत-इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान एका पत्रकार परिषदेत अँडरसनने विराटच्या धावांच्या सातत्यात भारतीय खेळपट्टय़ांची भूमिका महत्त्वाची आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून वाद निर्माण केला. याबाबत कपिल म्हणाले, ‘‘दोन वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये विराटला धावांसाठी झगडावे लागले होते. मात्र आता तो इंग्लंडसहित कोणत्याही देशात धावा काढू शकेल. सर्व प्रकारच्या वातावरणात खेळण्यासाठी विराट सक्षम आहे. तो आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे. एखादा भारतीय खेळाडू अशा प्रकारे खेळताना पाहणे, हे कौतुकास्पद आहे. तो गॉगल घालूनसुद्धा धावा करू शकतो.
विराटच्या नेतृत्वाविषयी कपिल म्हणाले, ‘‘त्याने आतापर्यंत पाच मालिका जिंकण्याचे कर्तृत्व दाखवले असले तरी याबाबत मत प्रदर्शित करणे घाईचे ठरेल. त्याला अजून खूप टप्पा गाठायचा आहे.’’
विराटबाबत मदनलाल म्हणाले की, ‘‘त्याने संघात नवी ऊर्जा निर्माण केली आहे. कर्णधार संघाला आत्मविश्वास देतो. हीच गोष्ट त्याने केली आहे. त्यामुळे अँडरसनला काय हवे ते बरळू दे. याचा त्याच्या कामगिरीवर कोणताही परिणाम होणार नाही.’’
अँडरसनच्या वक्तव्याचा समाचार घेताना हक म्हणाले, ‘‘अँडरसनला मी भारतात अनेक फलंदाजांना बाद करताना कधीच पाहिले नाही. त्यामुळे विराटच्या धावा आणि क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अँडरसनचे आश्चर्य वाटते.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘विराटने इंग्लंडमध्ये धावा केल्या की त्याला दर्जेदार फलंदाज हे प्रमाणपत्रच जणू मिळते, असे तर अँडरसनला म्हणायचे नाही ना? इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आशियात झगडताना दिसतात. याचा अर्थ असा काढायचा का की ते दुबळे संघ किंवा खराब खेळाडू आहेत? कसोटी क्रिकेटमध्ये धावा महत्त्वाच्या असतात. त्यामुळे त्या कुठे होतात, याला अजिबात महत्त्व नाही.’’
‘‘एखाद्या खेळाडूने धावांचे योगदान देत किती वेळा संघाला जिंकून दिले, हे माझ्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे. फलंदाजाने ८० धावा काढून संघाला जिंकून देणे, हे दीडशे धावा काढूनही संघ हरण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे मला वाटते,’’ असे हक यांनी सांगितले.
विराट हा गुणी क्रिकेटपटू असून, तो कोणत्याही वातावरणात धावा करू शकतो.
–कपिल देव, भारताचे माजी कर्णधार
विराटच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याआधी अँडरसनने भारतात बळी घेऊन दाखवावेत.
–इंझमाम उल हक, पाकचे माजीकर्णधार
अँडरसनला काय हवे ते बरळू दे. याचा विराटच्या कामगिरीवर कोणताही परिणाम होणार नाही.
– मदनलाल, माजी क्रिकेटपटू
अँडरसनला असे म्हणायचे का, की तो स्वत: फक्त इंग्लिश वातावरणात गोलंदाजी करू शकतो?