राजनीति
उद्धव ठाकरे मोदींनाही भेटणार?
उद्धव आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची एकाच दिवशी जेटलींशी स्वतंत्र भेट
नोटाबंदीच्या मुद्दय़ावरुन शिवसेनेने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अर्थमंत्री अरुण जेटली यांची गुरुवारी नवी दिल्लीत भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिष्टमंडळासह जेटली यांना गुरुवारीच भेटणार असून एकाच दिवशी स्वतंत्रपणे होत असलेल्या या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही भेट होऊ शकते, असे सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा दिला असला तरी चुकीच्या अंमलबजावणीमुळे जनतेचे हाल होत असल्याने त्याविरोधात शिवसेनेने पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. जिल्हा बँकांवरील र्निबध मागे घेण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ जेटली यांना गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास भेटणार आहे. त्या शिष्टमंडळात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेत्यांचा समावेश आहे. शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई या शिष्टमंडळात असतील. मात्र शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे हेही जेटली यांची गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता भेट घेणार आहेत.
ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचीही नवी दिल्लीत बुधवारी भेट घेऊन नोटाबंदीच्या मुद्दय़ावर चर्चा केली. जनतेचे होत असलेले हाल सरकारपुढे मांडण्यासाठी ठाकरे हे राजनाथ सिंह, जेटलीच काय, पण मोदींनाही भेटतील, असे शिवसेनेचे प्रसिद्धिप्रमुख हर्षल प्रधान यांनी सांगितले. मात्र ठाकरे व मोदी यांची भेट बुधवारी सायंकाळपर्यंत ठरलेली नसून ठाकरे हे गुरुवारी रात्री मुंबईत परततील.