राजनीति
कलशयात्रेतच ‘शिव’संग्राम!; शोभायात्रा म्हणजे भाजपचे शक्तिप्रदर्शन, मेटेंची टीका
अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या भूमिपूजनावरून श्रेयवादाचा सामना करणाऱ्या भाजपने मित्रपक्षांची नाराजी दूर केली असली तरी महायुतीतील घटकपक्ष असलेल्या ‘शिवसंग्राम’चे नेते विनायक मेटे यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. मुंबईतून शिवस्मारकासाठी जल-मातीच्या कलशाची शोभायात्रा सुरू झाली आहे. ही शोभायात्रा म्हणजे भाजपचे शक्तिप्रदर्शन आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. शिवस्मारकाचे भूमिपूजन केवळ भाजपचा अजेंडा राबवण्यासाठी आहे, असा आरोपही त्यांनी केल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिले आहे
मुंबई येथे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपूजन व जलपूजन होणार आहे. या कार्यक्रमास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार की नाही, यावरून आधीच वाद झाले. सन्मानपूर्वक आमंत्रण मिळाल्यावर अखेर त्यांनी उपस्थित राहण्याचे मान्य केले. या स्मारकाचे श्रेय एकटय़ा भाजपला मिळावे, अशी व्यूहरचना केली गेली आहे. त्याचे प्रत्यंतर स्थानिक पातळीवरील कार्यक्रमांमध्ये येऊ लागले आहे. नाशिक येथे गुरुवारी झालेल्या गोदावरी नदीच्या जल संकलन कार्यक्रमापासूनही भाजपने मित्रपक्ष शिवसेनेला चार हात दूर ठेवल्याचे दिसून आले. शिवसेनेच्या एकाही स्थानिक पदाधिकाऱ्याला कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपने दिले नव्हते, असे सांगण्यात आले. महापालिका निवडणुका लक्षात घेऊन एखाद्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’प्रमाणे भाजपने जल संकलन कार्यक्रम आयोजित केला. मराठा आरक्षणावरून राज्यात निघालेल्या मूक मोर्चामुळे उशिरा का होईना, भाजपला शिवाजी महाराजांची आठवण झाली. शिवाजी महाराज हे कोणत्या एका पक्षापुरते मर्यादित नाहीत. भूमिपूजन सोहळ्यास किल्ल्यांवरील माती नेताना भाजपला साल्हेर-मुल्हेरचा विसर पडला. भाजपचे शिवाजी महाराजांवरील प्रेम दिखाऊ आहे, अशी टीका शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केली होती. आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनीही शोभायात्रेच्या कार्यक्रमावरून भाजपला लक्ष्य केले आहे. कलश शोभायात्रा म्हणजे भाजपचे शक्तिप्रदर्शन असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच ते शोभायात्रेतून निघून गेले.
शिवसेना-भाजपतील मतभेदांबाबत माहिती नाही. हा सगळा श्रेयाचा भाग आहे. महापालिका निवडणुका समोर आल्यामुळे हे होणारच आहे. भाजपने शिवसेना आणि घटकपक्षांना सोबत घ्यायला हवे होते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.