Menu

राजनीति
पुण्यातील बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई; मतमोजणीला सुरूवात

nobanner

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. यामध्ये पुणे आणि लातूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींचा समावेश आहे. पुणे या बालेकिल्ल्यात होणाऱ्या दहा नगरपालिकांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई असून, पुण्यात पीछेहाट झाल्यास राष्ट्रवादीच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे पहिल्या टप्प्यातील विजयाची परंपरा कायम राखण्यासाठी भाजपने सारा जोर लावला आहे. यामध्ये राजकीय वर्तुळाचे सर्वाधिक लक्ष बारामती नगरपालिकेच्या निकालांकडे लागले आहे. यानिमित्ताने अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वरचढ कोण ठरणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल. मुख्यमंत्र्यांनी याठिकाणी जाहीर सभा घेऊन विरोधकांना पाणी पाजेन, अशी गर्जना केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आपला गड राखता येणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पुण्यातील जेजुरी, बारामती, तळेगाव, लोणावळा, दौंड, सासवड, शिरूर, आळंदी, इंदापूर, जुन्नर या नगरपालिकांसाठी मतदान झाले. पुणे जिल्ह्यातील ३२४ जागांवर १३२६ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. जेजुरीत ८६.१४ टक्के मतदान झाले तर, तळेगाव ६८.२२, दौंड ६०.६१, सासवड ७५.१२, शिरूर ७३.४७, आळंदी ८२.३०, इंदापूर ७७.७२ तर जुन्नरमध्ये ७२.४३ टक्के मतदान झाले.
पहिल्या टप्प्यात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले होते. तब्बल ३१ नगरपालिका जिंकून भाजपने आघाडी घेतली आहे. तर ५२ ठिकाणी भाजपचे थेट नगराध्यक्षही निवडून आले आहेत. भाजपपाठोपाठ २० नगरपालिका जिंकत काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. काँग्रेसचेही २२ ठिकाणी थेट नगराध्यक्ष निवडून आले. तर राष्ट्रवादी १७ नगरपालिकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. शिवसेना १६ नगरपालिकांसह शेवटच्या क्रमांकावर आहे. त्रिशंकू अवस्थेतील नगरपालिकांची संख्या तब्बल ३४ आहे.