राजनीति
बेटा करेगा राज बेचारा बाप जंगल जाएगा, अमरसिंह यांची अखिलेश यांच्यावर टीका
उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षात शुक्रवारी फूट पडली. पक्षाचे सुप्रिमो मुलायमसिंह यादव यांनी आपला मुलगा व मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह भाऊ रामगोपाल यादव यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील राजकारणातील यादवी पुन्हा एकदा दिसून आली. पक्षात मुलायमसिंह यादव यांच्यासह अखिलेश यांच्या बाजुनेही मोठे नेते आहेत. एकेकाळी मुलायमसिंहांपासून दूर झालेले अमरसिंह यांनी मात्र अखिलेश यांच्यावर उपरोधिक टीका करत मुलायमसिंह यांची बाजू घेतली आहे. ‘आज तो कुछ ऐसा लग रहा है कि राम चंद्र कह गए सिया से ऐसा कलयुग आएगा, बेटा करेगा राज बेचारा बाप जंगल को जाएगा’, अशा शब्दांत त्यांनी अखिलेश यांना फटकारले आहे. अखिलेश यांनी पक्षाचा अवमान केला असून त्याची शिक्षा म्हणूनच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे ते म्हणाले. मुलायमसिंह यांना आपले समर्थन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमरसिंह सध्या लंडनमध्ये आहेत. लवकरच ते भारतात परतणार आहेत.
मी मुलायमसिंह यांचे समर्थन करतो. त्यांचा अवमान म्हणजे पक्ष शिस्तीचा भंग करण्यासारखे आहे. मुलायमसिंह यांच्या विरोधात उभे राहिलेले काही मोठे लोक असंवैधानिक, अनैतिक आणि चुकीचे काम करत असल्याचे अमरसिंह यांनी म्हटले.
दरम्यान, अखिलेश यादव यांना पक्षातून काढल्यानंतर अनेक नेत्यांची गोची झाली आहे. मुलायमसिंह यांच्याकडे जायचे की अखिलेश यांच्याकडे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. आज (शनिवार) दिवसभर होणाऱ्या घडामोडीत अनेक गोष्टी समोर येणार आहेत.
समाजवादी पक्षाच्या राज्यातील नेत्या जुही सिंह यांनी पक्ष प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला असून आमच्या मुख्यमंत्र्यांना निलंबित केल्यानंतर या पदावर राहण्यात काही अर्थ नसल्याचे म्हटले. मी नेताजी (मुलायमसिंह यादव) यांच्याविरोधात नाही पण मुख्यमंत्री अखिलेश यांच्याबरोबर असल्याचे त्या म्हणाल्या.