खेल
अश्विन आणि जडेजाच्या फिरकीला सामोरे जाण्याचे आव्हान’
भारतीय संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा या फिरकीजोडीला सामोरे जाण्याचे आव्हान असणार आहे, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो याने दिली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवारी पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना खेळविला जाणार आहे. तत्पूर्वी इंग्लंडच्या संघाने भारताच्या ‘अ’ संघाविरुद्ध मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन सराव सामने खेळले. यात इंग्लंडने पहिल्या सराव सामन्यात विजय प्राप्त केला पण दुसऱया सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱया सराव सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना बेअरस्टो म्हणाला की, मी कसोटी मालिकेत अश्विन आणि जडेजाच्या फिरकीला सामोरे गेलो आहे. खेळपट्टीचा नूर ओळखून समोरच्या फलंदाजाला फिरकीजाळ्यात ओढण्याची कला त्यांना अवगत झाली आहे. त्यामुळे एकदिवसीय मालिकेत देखील या फिरकीजोडीचे आमच्यासमोर आव्हान असेल.
आर.अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तब्बल २८ विकेट्स मिळवल्या होत्या, तर जडेजाने २६ विकेट्स घेतल्या. भारतीय संघाने मालिका ४-० ने जिंकली होती.
दरम्यान, भारतीय संघ जेव्हा इंग्लंड दौऱयावर येईल तेव्हा नक्कीच भारतीय फलंदाजांना देखील आमच्या गोलंदाजांना सामोरे जाण्याचे आव्हान असेल, असेही बेअरस्टो पुढे म्हणाला. बेअरस्टोने नुकतेच भारतीय संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत ३५२ धावा केल्या होत्या. तर यष्टीरक्षण करताना ११ झेल टीपले होते आणि दोन स्टम्पिंग देखील घेतले. याशिवाय एकदिवसीय मालिकेसाठीच्या सराव सामन्यात बेअरस्टोने गुरूवारी संघातून सर्वाधिक ६४ धावांची खेळी साकारली होती. इंग्लंडने भारतीय संघासमोर विजयासाठी २८३ धावांचे आव्हान ठेवले होते. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली खेळलेल्या भारताच्या ‘अ’ संघाने सामन्यात सहा विकेट्सने विजय प्राप्त केला. रहाणेने कर्णधारी खेळी साकारत ९१ धावांची खेळी केली.
भारतीय गोलंदाजांविरुद्ध आम्हाला चांगल्या धावा करता येत असल्याचे सराव सामन्यांत दिसून आले आहे. पहिल्या सराव सामन्यात आम्ही ३०० चा आकडा सहज गाठला, तर दुसऱाय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २८२ धावा करता आला. त्यामुळे मालिकेत आम्ही भारतासमोर चांगले आव्हान उभारू शकतो याचा आत्मविश्वास मिळाला आहे. पुण्यात खेळताना आम्हाला या सराव सामन्यांचा नक्कीच फायदा होणार आहे, असे बेरअस्टोने सांगितले.