Menu

राजनीति
आता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपप्रणित एनडीएला ३६० जागा- सर्वेक्षण

nobanner

केंद्रातील मोदी सरकारचा निम्म्याहून जास्त सत्ताकालावधी पूर्ण झाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारची लोकप्रियता अद्याप कायम आहे. इंडिया टुडे समूह आणि कार्वे इनसाईट्स यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार आताच्या घडीला लोकसभा निवडणूक झाल्यास राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) ३६० जागा मिळतील. तर संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) अवघ्या ६० जागांवर समाधान मानावे लागेल. तर अन्य पक्षांना १२३ जागा मिळतील.
इंडिया टुडे समूह आणि कार्वे इनसाईट्स यांनी १९ राज्यांमध्ये १२,१४३ लोकांचे मत विचारत घेऊन सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार आता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ४२% मते मिळतील, तर काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीला २५% मतदारांची पसंती असेल. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी अडखळत असताना इतर पक्षांना मात्र ३३% मते मिळू शकतात, अशी आकडेवारी सर्वेक्षणातून समोर आली आहे.
पंतप्रधानांची कामगिरी कशी ?
पंतप्रधान म्हणून मोदींची कामगिरी चांगली असल्याचे ६९% लोकांनी म्हटले आहे. तर १९% लोकांनी मोदींची कामगिरी यथायथाच असल्याचे मत नोंदवले आहे. ३% लोकांना मोदींची कामगिरी वाईट असल्याचे वाटते आहे. तर ६% लोकांनी मोदींची कामगिरी अतिशय वाईट असल्याचे म्हटले आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारची कामगिरी उत्तम असल्याचे ७१% लोकांनी म्हटले आहे. लोकसभेच्या ९७ आणि विधानसभेच्या १९४ मतदारसंघांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
पंतप्रधान म्हणून कोणाला पसंती ?
पंतप्रधानपदाची पहिली पसंती कोणाला, असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ६५% लोकांनी आपले पसंती नरेंद्र मोदींना असल्याचे म्हटले आहे. तर राहुल गांधींना १०%, सोनिया गांधींना ४% लोकांनी पंतप्रधानपदासाठी पसंती दर्शवली. समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह आणि बसपाच्या प्रमुख मायावती पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचे मत प्रत्येकी १ टक्का लोकांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळातील अरुण जेटली पंतप्रधानपदी असावेत, असे २% लोकांना वाटते. तर भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना प्रत्येकी १ टक्का लोकांनी पसंतीची पावती दिली आहे. अरविंद केजरीवाल, प्रियांका गांधी आणि नीतिश कुमार यांना २ टक्के लोकांनी पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार म्हटले आहे.
नोटाबंदीच्या निर्णयाविषयी काय वाटते ?
पंतप्रधान मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला लोकांची मोठी पसंती मिळताना दिसते आहे. नोटाबंदीमुळे काळ्या पैशाला आळा बसेल, असे ४५% लोकांचे मत आहे. तर नोटाबंदीचा निर्णय अर्थव्यवस्थेसाठी चांगला असल्याचे ३५% लोकांनी म्हटले आहे. मात्र ७% लोकांनी नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था कमजोर होईल, असे मत व्यक्त केले आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे ५८% लोकांना वाटते आहे. तर ३४% लोकांनी नोटाबंदीमुळे कॅशलेस अर्थव्यवस्थेला कोणतीही गती मिळणार नाही, असे मत व्यक्त केले आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची कामगिरी कशी ?
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात अर्थ खात्याची असेलल्या धुरा असलेल्या अरुण जेटलींचे काम सर्वाधिक चांगले असल्याचे लोकांना वाटते आहे. जेटली यांच्या कामाला २३% लोकांनी पसंती दिली आहे. तर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे काम उत्तम असल्याचे प्रत्येकी २१% लोकांना वाटते. मनोहर पर्रिकर यांना १३% तर उमा भारती यांना १२% लोकांनी पसंतीची पावती दिली आहे.
तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व कोणाकडे ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात काँग्रेस अपयशी ठरत असताना अन्य पक्षांना लोकांची पसंती मिळते आहे. पंतप्रधान मोदींच्या विरोधात तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता अरविंद केजरीवालांकडे असल्याचे ११% लोकांना वाटते. तर नीतिश कुमार यांना १०% लोकांनी पसंती दर्शवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पर्याय केजरीवाल असू शकतात, असे मानणाऱ्यांचे प्रमाण १०% आहे, तर मोदींचा पर्याय म्हणून नीतिश कुमार योग्य ठरु शकतात, असे १३% लोकांना वाटते.