Menu

खेल
खेळाडू की सुपरमॅन? उसळता चेंडू लागूनही युवराजने ठेवला खेळ सुरू

nobanner

खूप काळानंतर युवराज सिंहचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन झाले. इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यामध्ये १५० धावांची खेळी केल्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्ये युवराज सिंहने ४५ धावा काढल्या. या सामन्या दरम्यान एक गोष्ट घडली की ज्यामुळे युवराज सिंहच्या इच्छाशक्तीची झलक आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या सामन्यादरम्यान एक उसळता चेंडू येऊन त्याला लागला. तेव्हा वाटले की तो आता तो आराम करेल. परंतु त्याने काही काळ आपला खेळ थांबवला आणि तो पुन्हा खेळू लागला.

या सामन्याच्या १० व्या ओव्हरमध्ये १३१ किमी प्रती तासाच्या वेगाने येणारा चेंडू त्याच्या छातीवर येऊन आदळला. इंग्लंडचा जॅक बॉल हा गोलंदाजी करीत होता. त्याच्या बाउन्सरने युवराजला गंभीर इजा केली. या चेंडूचा आघात गंभीर होता. त्याच्या हातातून बॅट खाली पडली. या आघाताची वेदना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसली. यानंतर मैदानावर शांतता पसरली. काही क्षणांसाठी असे वाटले की आता काय होईल? युवराज पुढे खेळू शकेल की नाही अशी शंका सर्वांच्याच मनात आली. मैदानावर उपस्थित असलेल्या पंचांनी त्याच्याजवळ जाऊन त्याची विचारपूस केली.

इंग्लंडच्याही खेळाडूंच्या चेहऱ्यावर त्याच्या विषयीची चिंता स्पष्ट दिसत होती. नॉन स्ट्रायकर एंडवर असणाऱ्या विराट कोहलीने युवराजची विचारपूस केली आणि त्याला चीअर-अप केले. थोड्याच वेळात तो पुन्हा खेळण्याच्या स्थितीमध्ये आला. त्यानंतर त्याने आपला खेळ सुरू केला. तो पुन्हा खेळत आहे असे पाहून सर्व चाहत्यांना आनंद झाला. तिसऱ्या विकेटसाठी त्याने विराटसोबत ६५ धावांची भागीदारी केली. युवराजने या सामन्यात चार चौकार आणि एक षटकार लगावत ४५ धावा केल्या. लियाम प्लॅंकेटने टाकलेला चेंडू सीमेपार लावण्याच्या प्रयत्नात युवराज झेलबाद झाला.
कोलकाता येथे झालेल्या घटनेचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट संघाने आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केला आहे. ‘युवस्ट्राँग’चा व्हिडिओ पाहा या शीर्षकाखाली त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. कर्णधार विराट कोहलीने युवराजला कसे चीअर अप केले हे पाहायला विसरू नका अशी सूचना देखील त्यांनी केली आहे. युवराज सिंहने या मालिकेमध्ये ७० च्या सरासरीने २१० धावा केल्या. कटकमध्ये झालेल्या सामन्यामध्ये युवराजने १५० धावा केल्या. ही त्याच्या कारकीर्दीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. काल झालेला इंग्लंडविरुद्धचा सामना हा अत्यंत चुरशीचा झाला. केदार जाधवने ७५ चेंडूत ९० धावा केल्या. हा सामना भारताने ५ धावांनी हरला. भारताने ही मालिका २-१ ने जिंकली आहे.