राजनीति
पंजाब, गोव्यासाठी भाजपची पहिली खेळी, उमेदवारांची पहिली यादी जाहीर
राज्यात आणि देशभर फेब्रुवारीचा महिना मोठ्या राजकीय घडामोडींचा ठरणार आहे. महाराष्ट्रात जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. तर देशात इतर ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. नोव्हेंबरमधल्या नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच एवढ्या सार्वत्रिक स्वरूपात निवडणुका होणार आहेत त्यामुळे पंतप्रधान मोदींसाठी ही एक कसोटी असेल. पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली मतदार यादी जाहीर केलीये. केंद्रीय आरोग्या मंत्री जे.पी नड्डा यांनी आज पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली. यात पंजाबसाठी १७ तर गोव्यासाठी २९ उमेदवारांची घोषणा झालीये. पंजाबमध्ये २३ जागांवर भाजप आपला उमेदवार उभा करणार असल्याचा अंदाज आहे तर उरलेल्या ९४ जागांवर भाजपचा मित्रपक्ष शिरोमणी अकाली दल त्यांचे उमेदवार उभे करणार आहे. पंजाबमध्ये ११७ विधानसभा जागांसाठी मतदान होतंय. पंजाब आणि गोव्यामध्ये ४ फेब्रुवारीला मतदान आहे, तर ११ मार्चला निकाल लागणार आहेत.
पंजाबमध्ये गेली १० वर्षं सत्तेवर असणाऱ्या भाजप- शिरोमणी अकाली दलाला यंदा अँटी इन्कम्बन्सीच्या भावनेचा फटका बसण्याची शक्यता आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला याचा फायदा घेता येतो का हे पाहणं महत्त्वांचं ठरणार आहे. पंजाबमध्ये काँग्रेसने चांगला परफाॅर्मन्स दिला तर राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला कमबॅक करायला अनुकूल वातावरण तयार होईल. पण भाजप आणि काँग्रेसला ‘आप’ फॅक्टरचा किती फटका बसतो याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. पंजाबमध्ये सत्ता मिळाली तर ‘फक्त दिल्लीपुरता मर्यादित असणारा पक्ष’ अशी आपली इमेज पुसून काढायला आम आदमी पार्टीला मदत होईल. अरविंद केजरीवालांच्या राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याच्या इच्छा आकांक्षांनाही त्यातून खतपाणी मिळेल. पंजाबमध्ये यश मिळालंं तरी आपण दिल्लीचं मुख्यमंत्रीपद सोडून पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी बसायला उत्सुक नाही असं केजरीवालांनी स्पष्ट केलं असलं तरी दिल्लीशेजारच्या या मोठ्या राज्याच्या निवडणुकीत ‘आप’ कडून जोरदार प्रयत्न होणार आहेत
भाजपच्या आजच्या पत्रकार परिषदेत नड्डा यांनी गोवा विधानसभा निवडणुकांसाठीही २९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. सध्या या राज्यात भाजप सत्तेवर आहे. यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने माजी इन्स्पेक्टर जनरल एल्विस गोम्स यांचं नाव पुढे केलंय. गोव्याच्या राजकारणातून राष्ट्रीय पातळीवर गेलेल्या केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. त्यांच्या या होमपीचवर भाजपची कामगिरी कशी राहते याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.