देश
भाजपमध्येही घराणेशाही, उत्तरप्रदेशमध्ये राजनाथ सिंह यांच्या मुलाला उमेदवारी
पाच राज्यांमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळणार नाही असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खडसावले असले तरी उत्तरप्रदेशमध्ये भाजपने ‘घराणेशाही’ला प्राधान्य दिले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचे चिरंजीव पंकज सिंह यांना नोएडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. याशिवाय खासदार हुकुमसिंह यांची कन्या मृगांका कैराना, लालजी टंडन यांचे चिरंजीव गोपाल टंडन यांनादेखील उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपने रविवारी १५५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये तब्बल ४० उमेदवार हे काँग्रेस, बहुजन समाज पक्ष यासारख्या पक्षांमधून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. ३६ तासांपूर्वी दुस-या पक्षातून आलेल्या एका नेत्यालाही भाजपने तिकिट दिल्याचे समोर आले. तर २४ उमेदवार हे भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासून पदाधिकारी आहेत.
काही दिवसांपूर्वी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीला विरोध दर्शवला होता. पण मोदींच्या या आदेशाला उत्तरप्रदेशमध्येच तिलांजली देण्यात आली आहे. राजनाथ सिंह यांचा मुलगा पंकज सिंह याला उमेदवारी मिळाल्याने भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांमध्ये असंतोष खदखदू लागला आहे. नोएडामधील भाजपचे सचिव संजय बाली यांनी पक्षातील सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. तर पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून काम करणारे काही ज्येष्ठ कार्यकर्तेही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे समजते. स्थानिक उमेदवारांना डावलून बाहेरुन उमेदवार लादल्याची भावना स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आहे. संजय बाली हे निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज भरण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दरम्यान, भाजपमधील या घराणेशाहीवरुन टीका सुरु झाली आहे. काँग्रेसमधील घराणेशाहीवरुन भाजपने नेहमीच टीका केली आहे. आता भाजपमध्येही हाच प्रकार सुरु झाल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.