खेल
विराट युगारंभ!
भारताच्या मर्यादित षटकांच्या कर्णधारपदाचा त्याग करणारा महेंद्रसिंग धोनी नऊ वर्षांहून अधिक काळानंतर प्रथमच यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनीचा वारसदार निर्माण व्हावा, या हेतूने दिल्लीचा यष्टीरक्षक रिषभ पंतला ट्वेन्टी-२० संघात स्थान देण्यात आल्याचे सांगितले, तर अजिंक्य रहाणेला वगळण्यात आले आहे. धोनीबाबत प्रसाद म्हणाले, ‘‘माहीची महती सर्वानाच माहिती आहे. निसर्गत: नेतृत्वगुण त्याच्यात आहेत. तो आघाडीवरून नेतृत्व करण्यात वाकबदार आहे.’’
रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेत युवराजने सातत्यपूर्ण फलंदाजी केली. यंदाच्या हंगामात त्याने पाच सामन्यांत ८४च्या सरासरीने एकूण ६७२ धावा केल्या. विवाहाच्या कारणास्तव विश्रांती घेण्यापूर्वी बडोद्याविरुद्धच्या सामन्यात युवीने २६० धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. त्याच्या पुनरागमनाबाबत प्रसाद म्हणाले, ‘‘युवराजच्या फलंदाजीला आम्ही न्याय दिला आहे. स्थानिक क्रिकेटमधील त्याचे सातत्य कौतुकास्पद आहे.’’
आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर अनुभवी वेगवान गोलंदाज नेहरा भारतीय ट्वेन्टी-२० संघात परतला आहे. इंग्लंडमध्ये जूनमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पध्रेपूर्वी फक्त इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला ५० षटकांच्या क्रिकेटचा सराव मिळणार आहे. त्यामुळे रहाणे वगळता सर्व प्रमुख खेळाडूंना दोन्ही संघांत स्थान देण्यात आले आहे. इंग्लिश वातावरणाचा पुरेसा अनुभव असलेल्या नेहरा आणि युवराजला याच कारणास्तव संधी देण्यात आली आहे.
आघाडीचे फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा इंग्लंडविरुद्धचे सहाही सामने खेळणार आहेत. एकदिवसीय संघात लेग-स्पिनर अमित मिश्राची निवड झाली आहे, तर ट्वेन्टी-२० संघात यझुवेंद्र चहलची त्याच्या जागी निवड करण्यात आली आहे.
दुखापतीतून सावरलेला शिखर धवन भारतीय एकदिवसीय संघात परतला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो के. एल. राहुलसोबत तर ट्वेन्टी-२० मध्ये पंजाबच्या मनदीप सिंगसोबत तो सलामीला उतरू शकेल. हरहुन्नरी फलंदाज मनीष पांडेने दोन्ही संघांमध्ये स्थान मिळवले आहे. रहाणेने एकदिवसीय संघातील स्थान टिकवले आहे, तर सुरेश रैनाचा ट्वेन्टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे.
भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंडय़ा हे तिघे जण दोन्ही संघांत भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा सांभाळतील. एकदिवसीय संघात उमेश यादव तर ट्वेन्टी-२० संघात नेहरा चौथा वेगवान गोलंदाज आहे.
संघनिवडीच्या प्रक्रियेविषयी प्रसाद म्हणाले, ‘‘कर्णधार कोहलीशी आम्ही ‘स्कायपे’च्या माध्यमातून चर्चा केली आणि सर्वोत्तम संघाची ही निवड केली आहे.’’
बैठकीला तीन तास उशीर
निवड समितीची बैठक शुक्रवारी जवळपास तीन तास उशिराने सुरू झाली. तांत्रिक मुद्दय़ावरून लोढा समितीच्या सूचनेनंतर तिला प्रारंभ झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदांवरून हटवण्यात आल्यानंतर संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांना अपात्र ठरवण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवारच्या बैठकीसाठी समन्वयक म्हणून बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी काम पाहिले.
भारतीय वरिष्ठ आणि ‘अ’ संघाच्या निवड समितीची बैठक दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी सुरू होणार होती. मात्र तांत्रिक कारणास्तव ही बैठक उशिराने सुरू होणार असल्याचे बीसीसीआयच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. त्यानंतर लोढा समितीकडून लिखित सूचना ई-मेलद्वारे प्राप्त झाल्यानंतरच बैठकीला प्रारंभ झाला.
युवराजचे दोन्ही संघांत तर नेहराचे ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन; ऋषभ पंत नवा चेहरा
लोढा समितीच्या शिफारशींमुळे एकीकडे सुधारणेचे पर्व क्रिकेट प्रशासनामध्ये नांदू लागले असताना भारतीय क्रिकेटमधील ‘विराट युगारंभा’वर शुक्रवारी अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आले. अपेक्षेप्रमाणेच भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे सोपवण्यात आले. त्यामुळे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत कोहली आता भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. याचप्रमाणे इंग्लंडविरुद्ध आगामी मालिकेसाठी युवराज सिंगचे दोन्ही संघांत, तर आशीष नेहराचे ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन झाले आहे.
भारताचा एकदिवसीय संघ
विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), के. एल. राहुल, शिखर धवन, मनीष पांडे, केदार जाधव, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंडय़ा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव.
भारताचा ट्वेन्टी-२० संघ
विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), मनदीप सिंग, के. एल. राहुल, युवराज सिंग, सुरेश रैना, रिषभ पंत, हार्दिक पंडय़ा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, यझुवेंद्र चहल, मनीष पांडे, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशीष नेहरा.
मी दररोज नव्या गोष्टी शिकतो आहे. कामगिरीत सुधारणा करत राहणे आवश्यक आहे. आयपीएलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी झालेला संवाद उपयुक्त ठरला.
– ऋषभ पंत, क्रिकेटपटू
कर्णधारपद स्वीकारण्यासाठी कोहलीसाठी हा योग्य कालावधी आहे. मर्यादित षटकांमधील कर्णधार म्हणून धोनीची कामगिरी अतुलनीय आहे. धोनीचा वारसा पुढे चालवणे अवघडच आहे मात्र कोहलीने दिमाखदार प्रदर्शनासह संघासमोर अनोखे उदाहरण सादर केले आहे.
– रवीचंद्रन अश्विन, फिरकीपटू
२०१९ विश्वचषकात खेळण्याचा मनोदय नसेल तर कर्णधारपद सोडण्याचा धोनीचा निर्णय योग्यच आहे. धोनीचा अनुभव आणि उपयुक्तता वादातीत आहे. संघातील स्थान कमावणे आवश्यक असते. धोनीला याची पूर्ण जाणीव आहे.
– राहुल द्रविड, माजी कर्णधार
तेव्हा बघ्याची भूमिका घेणे भ्याडपणाचे-कोहली
महिलांवर अत्याचार होत असताना बघ्याची भूमिका घेणे भ्याडपणाचे लक्षण आहे असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. बंगळुरूत नववर्षांच्या पहाटे महिलेवर झालेल्या अत्याचारासंदर्भात कोहली बोलत होता. महिलांवर अत्याचार करणाऱ्या विकृत लोकांचा समावेश असलेल्या समाजात राहताना लाज वाटते अशा शब्दांत कोहलीने खेद व्यक्त केला. बंगळुरूत घडलेली घटना दुर्देवी आहे. अशा लोकांना पुरुष म्हणवून घेण्याचाही अधिकार नाही. तुमच्या घरातील कुटुंबियासमवेत असा प्रसंग घडल्यास तुम्ही बघत राहणार का?असा सवालही कोहलीने केला. तिथे उपस्थित असणाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवले असते तर हा प्रसंग टाळता आला असता. पोशाख हा अत्यंत खाजगी विषय आहे. महिलांप्रतीचा दृष्टिकोन बदलणे अत्यावश्यक आहे.