Menu

खेल
Live Cricket Score, India vs England, 2nd ODI

nobanner

भारतीय संघाला २०११ साली विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय प्राप्त करून देणारी युवी-धोनी जोडगोळीचे वादळ आज कटक वनडेमध्ये अनुभवायला मिळाले. विश्वचषक स्पर्धेनंतर कॅन्सरशी दोन हात करून पुनरागमनासाठी बेतोड मेहनेत घेतलेल्या पंजाबच्या शेरेदिल युवराजने आज आपले जुने रुप दाखवून दिले. अनेक अडथळे आले तरीही मज पर्वा ना कुणाची..असे म्हणत युवीने तीन वर्षांनंतर मिळालेल्या संधीचे सोने केले. युवराज सिंगने कटकच्या सामन्यात एकदिवसीय करिअरमधील आपली १५० धावांची वैयक्तिक सर्वोत्तम खेळी साकारून आपल्या फलंदाजीतील जोश आजही तसाच आहे, हे दाखवून दिले. धोनीनेही युवराजला उत्तम साथ देत शानदार शतक ठोकले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी तब्बल २५६ धावांची भागीदारी रचून संघाला तीनशेचा आकडा पार करून दिला. युवराजच्या दीडशे, तर धोनीच्या १३४ धावांच्या जोरावर भारतीय संघाने पन्नास षटकांच्या अखेरीस इंग्लंडसमोर विजयासाठी ३८२ धावांचा डोंगर उभारला आहे.
कटक येथील सामन्याचा नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या कर्णधार मॉर्गनने घेतलेला निर्णय सुरूवातील योग्य ठरताना दिसला. कारण, भारतीय संघाचे तीन फलंदाज स्वस्तात बाद झाले. ख्रिस वोक्सने लोकेश राहुल ,विराट कोहली आणि शिखर धवन यांना तंबूत पाठवले आहे. लोकेश राहुल आणि विराट कोहली वोक्सच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये झेलबाद झाले. बेन स्टोक्सने दोघांचेही उत्तम झेल टीपले. तर शिखर धवन क्लीनबोल्ड होऊन माघारी परतला. संघाचे तीन शिलेदार स्वस्तात बाद झाल्यानंतर युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांनी संघाचा डाव सावरला आहे. युवराजने आपल्या नजाकती फटक्यांची चौफेर फटकेबाजी करत कटकच्या स्टेडियमवर झुंजार शतकी खेळी साकारली आहे. तर धोनी देखील शतकाच्या जवळ पोहोचला आहे. २९ धावांवर तीन विकेट्स पडलेल्या भारतीय संघाला धोनी आणि युवराजने शतकी भागीदारी रचून सावरले आहे. भारतीय संघाने सध्या २०० धावांचा टप्पा देखील ओलांडला आहे.
कटक सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. लियाम प्लंकेट याला इंग्लंडच्या संघात संधी देण्यात आली आहे. तर भारतीय संघात देखील उमेश यादवच्या जागी भुवनेश्वर कुमार याला संधी देण्यात आली आहे.