मनोरंजन
अब्रामसह शाहरुख खानने दिली सुवर्णमंदिराला भेट
अभिनेता शाहरुख खान त्याच्या चित्रपटांच्या निमित्ताने कितीही अभिनेत्रींसोबत झळकला असला तरीही त्याच्या रोजच्या जीवनात त्याचा एक खास पार्टनर मात्र त्याची साथ काही केल्या सोडत नाहीये असेच म्हणावे लागेल. शाहरुखचा हा पार्टनर म्हणजेच त्याचा लहान मुलगा अब्राम. चित्रपटाच्या सेटपासून ते अगदी चाहत्यांच्या गर्दीमध्ये शाहरुख आणि अब्राम हल्ली नेहमीच एकत्र दिसतात. ‘रईस’ या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी भ्रमंती करणाऱ्या किंग खानने नुकतेच अमृसतर येथील सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे.
हरमंदिर साहिबला भेट देऊन शाहरुख आणि अब्रामने मोठ्या भक्तिभावाने नतमस्तक होत या श्रद्धास्थळापाशी प्रार्थना केली. शाहरुखच्या तिन्ही मुलांपैकी अब्राम सध्या सर्वात जास्त वेळ त्याच्या ‘सुपरडॅड’सोबतच व्यतित करत आहे. त्यामुळे त्यालाही वडिलांच्या प्रसिद्धीचा, प्रसारमाध्यमांचा, छायाचित्रकारांचा एकंदर अंदाज आला असावा असेच म्हटले जात आहे. किंग खानने ज्यावेळी अमृसरच्या सुवर्णमंदिराला भेट दिली त्यावेळी तिथे चाहत्यांच्या चेहऱ्यावर एकच उत्साह पाहण्यास मिळाला होता. यावेळी शाहरुख आणि अब्रामने हरमंदिर साहेब येथील प्रसादही घेतला, त्यासोबतच या दोघांच्याही हातात शीख संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणारा ‘कडा’ही पाहण्यात आला.
शाहरुख आणि अब्रामची ही सॉलिड टीम विविध ठिकाणी जाऊन अनेकांचेच लक्ष वेधत असते. काही दिवसांपूर्वीच शाहरुखने ‘टिव्हीएफ’ला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान अब्राम आणि त्याच्यातील सुरेख केमिस्ट्री पाहण्यात आली. या मुलाखतीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच चर्चेत होता. व्हिडिओमध्ये अब्राहम आपल्या वडिलांना अंगठ्याला दुखापत झाल्याचे सांगताना दिसते. अब्राहमच्या दुखापतीवर इलाज करण्यासाठी शाहरुख डॉक्टरची भूमिका करताना दिसते. गंमत म्हणून शाहरुख अब्राहमला इंजेक्शन देण्याचा अभिनय करतो. शाहरुखने केलेल्या डॉक्टरच्या अभिनयाला अब्राहमने थक्क करणारी प्रतिक्रीया दिल्याचे दिसते. शाहरुखने इंजेक्शन दिल्याचे नाटक केल्यानंतर अब्राहमनेही आपल्यातील अभिनयाचा गुण दाखवून दिला. इंजेक्शन दुखल्याचे त्याचे हावभाव अभिनयाला साजेसे असेच आहेत.