खेल
‘किंग कोहली’चा द्विशतकी ‘चौकार’, डॉन ब्रॅडमनलाही टाकले मागे
अफलातून टायमिंग, कमालीचा फिटनेस आणि लाजवाब फटक्यांनी गेल्या काही वर्षांपासून धावांची टांकसाळ उघडलेल्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत कारकीर्दीतील चौथे द्विशतक ठोकले. ‘विराट’ ध्येयासक्तीने पछाडलेल्या कोहलीला आता रोखणे प्रतिस्पर्धी गोलंदाजांना अशक्य वाटू लागले आहे इतकी दहशत त्याने आपल्या फलंदाजीने निर्माण केली आहे. भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी खांद्यावर आल्यापासून कोहलीने अजिबात दबाव निर्णान होऊ देता आपले नेतृत्त्व गुण सिद्ध केले. कोहलीने २०१६-१७ या एकाच वर्षात कसोटीत लागोपाठ चार द्विशतके ठोकली आहेत. अशी कामगिरी करणारा कोहली पहिलाच फलंदाज ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय कसोटी विश्वाच्या इतिहासात असा लागोपाठ चार द्विशतकं ठोकण्याचा पराक्रम याआधी कोणत्याच खेळाडूने केलेला नाही. त्यामुळे कोहली नक्कीच आजवरच्या फलंदाजांपेक्षा वेगळा ठरतो. याआधी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटवीर सर डॉन ब्रॅडमन आणि राहुल द्रविड यांच्या नावावर हा विक्रम होता.
क्रिकेटच्या तिनही प्रकारात त्याची परिस्थितीनुसार फलंदाजी करण्याचे कौशल्य डोळे विस्फारणारे आहे. वन डे म्हटलं की कोहलीचे शतक आणि कसोटी सामना म्हटलं की कोहलीची द्वीशतकी खेळी ठरलेली, असे गणित आता कोहलीचे चाहत्यांनी तयार केले आहे. चाहत्यांच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासही कोहली प्रत्येकवेळी यशस्वी होतो आणि यामुळे तो आज भारतीय चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. ‘रनमशिन’ म्हणून निर्माण केलेली ओळख आता ‘किंग कोहली’च्या दिशेने वाटचाल करत आहे.
कोहलीने पहिले द्विशतक २०१६ जुलैमध्ये वेस्ट इंडिजमध्ये झळकावले होते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध इंदूरमध्ये, इंग्लंडविरुद्ध मुंबईत आणि आता हैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्ध द्वीशतकी खेळी साकारली. हैदराबादमध्ये कोहलीने कसोटीच्या पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील १६ वे कसोटी शतक पूर्ण केले होते. कसोटी क्रिकेट खेळणाऱया सातही देशांविरोधात कोहलीने शतकी कामगिरी केली आहे. तो अद्याप झिम्बाब्वे आणि पाकिस्तानविरुद्ध कसोटी खेळलेला नाही.