Menu

अपराध समाचार
चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची पत्नीकडून हत्या

nobanner

नरेंद्रनगरातील घटना
मद्य प्राशन करून रोज घरी भांडण करण्यासह पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची पत्नीने रागाच्या भरात डोक्यावर हातोडीने वार करून हत्या केली. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे नरेंद्र नगरच्या आदिवासी सोसायटीत खळबळ उडाली.
तिलक गुलाबसिंग मडावी (४६) असे मृताचे तर राणी तिलक मडावी (४४) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. दोघेही मध्य प्रदेशातील असले तरी सध्या नागपूरच्या प्लॉट नं. ४७, आदिवासी सोसायटी, नरेंद्र नगर, जगदीश हरीदास गोलाईत यांच्या घरी भाडय़ाने घरी राहतात. त्यांना दोन मुले असून एक २० वर्षीय मुलगा नागपूरला तर दुसरा मध्य प्रदेशात त्यांच्या नातेवाईकाकडे राहतो. तिघेही नळ जोडणीसह विविध कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तिलकला मद्याचे व्यसन असून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह मुलालाही त्रास देत होता. शनिवारी त्याने घरी मुलासोबत वाद घातला. शेजारील मुलाच्या मित्रांच्या निदर्शनात हा प्रकार आल्यावर त्यांनी मध्यस्थी करून मुलाला बाहेर नेले. काही वेळाने पतीने पत्नीशी वाद घालणे सुरू केले. पत्नीला शिवीगाळ केल्याने तिचा राग अनावर झाला. तिने घरातील हातोडीने पतीच्या डोक्यावर व त्यानंतर शरिराच्या विविध भागावर वार केले. शेजारच्यांनी खिडकीतून घरात डोकावून बघितले असता त्यांना हा प्रकार दिसला. काहींनी घरात प्रवेश करून जखमी तिलकला मेडिकलमध्ये हलवले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नीवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली.