देश
‘पीस फॉर रन’ साठी धावले हजारो नाशिककर, रणजीत पटेल विजेता
नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजीत ‘२१ के’ अर्ध मॅरेथॉनमध्ये ‘पीस फॉर रन’हे ब्रीदवाक्य असलेल्या शर्यतीत हजारो नाशिककरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या शर्यतीत रणजीत पटेल हा विजेता ठरलला.
महापालिका निवडणुकीच्या धामधुमीतही ही मॅरेथॉन यशस्वीपणे पार पडली. मॅरेथॉनच्या यंदाचे हे सलग दुसरे वर्ष. सकाळी सहा वाजेपासून शर्यतीत नाशिककरांनी भरभरून सहभाग नोंदवला. राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय स्पर्धकांसह नाशिकच्या १२ हजारांपेक्षा अधिक जणांनी यामध्ये सहभाग घेतला. आज सकाळी सहा ते दहा या वेळेत ही स्पर्धा पार पडली.
अभिनेत्री सायली भगत, धावपटू कविता राउत यांची स्पर्धेला प्रमुख उपस्थिती होती. अमेरिकेसह दक्षिण आफ्रिका, बेल्जियम, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, तैवान आदी देशांतील ३५ स्पर्धकांनी या शर्यतीत रन फॉर पीससाठी धाव घेतली.
या शर्यतीस सकाळी साडेसहा वाजता प्रत्यक्ष सुरूवात झाली. स्पर्धतील पाच आणि तीन किमी अंतराच्या रनसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. नाशिकमधील विविध स्वयंसेवी संस्था, क्रीडा संस्था, शाळा व महाविद्यालयीन युवकांनी यात सहभाग नोंदवला.
शर्यतीचे वेगळेपण जपण्यासाठी सैन्याचा बॅन्ड, नाशिक पोलीस बॅन्ड, ढोल ताशा पथके यांनी सहभाग घेत स्पर्धेत रंगत आणली. नाशिक पोलीस बॅन्ड व ढोल ताशा पथक यांच्या ध्वनीने उपस्थितांना भारावून टाकले. देशभक्तीपर गीतांचेही यावेळी सादरीकरण करण्यात आले.