खेल
मालिका विजयाचे लक्ष्य!
दुसऱ्या ट्वेन्टी-२० लढतीत अनपेक्षित विजय मिळवल्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची मालिका रंगतदार अवस्थेत आली आहे. तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांची १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या तिसऱ्या लढतीत विजय मिळवून मालिका जिंकण्याचे लक्ष्य दोन्ही संघांनी डोळ्यापुढे ठेवले आहे.
पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसऱ्या लढतीतही भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती; पण भेदक गोलंदाजी आणि त्यांना मिळालेली संथ खेळपट्टीची साथ, यामुळे भारताला हा सामना जिंकता आला होता. आता तिसरा सामना जर भारताला जिंकायचा असेल तर त्यांनी फलंदाजीवर अधिक मेहनत घ्यायला हवी. फलंदाजी हे भारताचे नेहमीच बलस्थान राहिलेले आहे; पण गेल्या दोन्ही ट्वेन्टी-२० लढतींत भारतीय फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहली सलामीला येऊन चांगली सुरुवात करत असला तरी त्याला मोठी खेळी साकारण्यात अपयश येत आहे. गेल्या सामन्यात लोकेश राहुलने अर्धशतक झळकावले होते, त्यामुळे त्याच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील. सुरेश रैना, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी यांच्याकडून लौकिकाला साजेशी फलंदाजी पाहायला मिळालेली नाही. त्यामुळे या सामन्यात त्यांच्या फलंदाजीवर साऱ्यांच्या नजरा असतील. गोलंदाजीमध्ये अनुभवी आशीष नेहरा चांगला मारा करत आहे, पण त्याला किमान क्षेत्ररक्षण करताना अपयश येताना दिसत आहे. युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह शांतचित्ताने भेदक मारा करताना दिसत आहे. त्याने गेल्या सामन्यातील अखेरच्या षटकात केलेली गोलंदाजी ही कौतुकास्पद अशीच होती. फिरकीपटू अमित मिश्राही चांगला मारा करत आहे. रैना कामचलाऊ गोलंदाजी करत असला तरी त्याला अपेक्षित यश मिळालेले नाही. रैनाबरोबर कोहली युवराजला गोलंदाजी देण्याचा प्रयोग करू शकतो.
इंग्लंडच्या संघाने गेल्या दोन्ही ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये सरस कामगिरी केली आहे. गेल्या सामन्यात त्यांनी वर्चस्व दाखवले होते, पण अखेरच्या षटकामध्ये त्यांनी सामना गमावला. जो रूट हा सातत्याने धावा करत आहे. त्याचबरोबर कर्णधार इऑन मॉर्गन आणि बेन स्टोक्स यांच्याकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे. गोलंदाजीमध्ये ख्रिस जॉर्डन आणि मोइन अली यांनी आपली छाप पाडलेली आहे. इंग्लंडला या सामन्यात गोलंदाजीची जास्त चिंता नसली तरी त्यांना फलंदाजीवर अधिक मेहनत घेणे भाग आहे, कारण त्यांच्याकडे तळाच्या फळीत अष्टपैलू खेळाडू असले तरी त्यांना जास्त धावा जमवता आलेल्या नाहीत.
दुसरा सामना जिंकल्यामुळे भारताचे मनोबल या सामन्यासाठी नक्कीच उंचावलेले असेल; पण नुसते मनोबल उंचावल्यामुळे त्यांना तिसरा सामना जिंकता येणार नाही, तर त्यासाठी अथक मेहनत घ्यायला हवी. त्याचबरोबर गेल्या दोन सामन्यांतील चुका दुरुस्त करायला हव्यात, तरच त्यांना हा सामना जिंकता येईल. दुसरा सामना गमावला असला तरी इंग्लंडचे खच्चीकरण झालेले नसेल, कारण गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. या सामन्यातही त्यांनी सातत्य राखल्यास ते मालिका जिंकू शकतात. त्यामुळे हा सामना चांगलाच रंगतदार होईल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांमधून व्यक्त केली जात आहे.
दुसऱ्या ट्वेन्टी-२० लढतीत सदोष पंचगिरीचा फटका आम्हाला बसला, असे म्हणत इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने वाद उकरून काढला होता. त्यावर भारताचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने, ‘पंचांचे निर्णय दोन्ही संघांसाठी समानच असतात, त्याचा दोन्ही संघांना फायदा किंवा नुकसान होत असते,’ असे म्हणत वाद-विवादाला पूर्णविराम दिला आहे.
‘पंचांच्या निर्णयावर आम्ही जास्त लक्ष देत नाही. काही वेळा पंचांचे निर्णय आमच्यासाठी फायदेशीर असतात, तर कधी प्रतिस्पर्धी संघांच्या फायद्याचे ठरतात. क्रिकेटमध्ये या गोष्टी घडतच असतत, त्या खेळाचाच एक भाग आहेत. त्यामुळे या साऱ्या गोष्टी विसरून पुढे जायला हवे,’ आसे बुमराह म्हणाला.
दुसरी ट्वेन्टी-२० लढत रंगात आली असताना पंचांनी इंग्लंडच्या जो रूटला पायचीत दिले. त्यानंतर इंग्लंडने सामन्यावरील पकड गमावली. पंचांनी रूटला पायचीत बाद ठरवले असले तरी त्याच्या बॅटला चेंडूचा स्पर्श झाल्याचे कालांतराने दिसून आले. त्यामुळे या निर्णयावर मॉर्गनने नाराजी व्यक्त केली होती.