देश
वाचवलेल्या कोब्राला किस करण्याचा प्रयत्न, सर्पमित्राचा मृत्यू
कोब्राला किस करुन फोटो काढणं एका सर्पमित्राच्या जिवावर बेतलं आहे. सापाच्या दंशाने नवी मुंबईतील सोमनाथ म्हात्रे या सर्पमित्राचा मृत्यू झाला आहे.
सापाच्या दंशाने मृत्यू होण्याची 12 वर्षातली ही 31वी घटना आहे.
अशाप्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये यासाठी वनविभागाने नियमावली जारी करावी अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत. तसंच अशा स्टंटमध्ये सहभागी असणारे आणि त्याचे फोटो काढून पोस्ट करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.
किस ऑफ डेथ!
नवी मुंबईतील सीबीडी बेलापूरचा रहिवास असलेला सोमनाथ म्हात्रेचा 2 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. सीबीडी बेलापूरमध्ये एका कारमध्ये साप असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमनाथ तिथे गेला. पण सापाला वाचवल्यानंतर सोमनाथ कोब्राला घेऊन दुसऱ्या ठिकाणी गेला. तिथे त्याने कोब्राच्या डोक्याला किस करण्याचा प्रयत्न केला. पण अचानक कोब्रा सोमनाथच्या छातीला चावला.
यानंतर सोमनाथला उपचारांसाठी नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याच्यावर पाच दिवस उपचार सुरु होते. मात्र 2 फेब्रुवारी रोजी त्याचा मृत्यू झाला.
सोमनाथने आतापर्यंत 100 हून अधिक सापांना वाचवलं आहे.
याआधी कोब्राला किस करण्याचा प्रयत्न करणाऱ्या साताऱ्यातील एका सर्पमित्राचा मृत्यू झाला होता.