राजनीति
उत्तराखंडमध्ये ‘त्रिवेंद्र’ सरकार!; उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
उत्तराखंडमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळाल्यानंतर आज शुक्रवारी देहरादूनमध्ये झालेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्षनेतेपदी आमदार त्रिवेंदसिंह रावत यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी रावत हे विराजमान होतील. उद्या दुपारी तीनच्या सुमारास रावत हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. या शपथ सोहळ्याला भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. रावत हे संघाचे प्रचारक आहेत. तसेच ते अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात.
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यात भाजपला उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले. उत्तराखंडमधील ७० पैकी ५७ जागांवर भाजपला विजय मिळाला. तर काँग्रेसला केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले. उत्तराखंडमध्ये पक्षनेतृत्वाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक त्रिवेंद्रसिंह रावत यांच्यावर विश्वास दाखवला आहे. मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी आज भाजपच्या आमदारांची देहरादूनमध्ये बैठक झाली. या बैठकीत विधीमंडळ नेतेपदी आमदार त्रिवेंद्रसिंह रावत यांची निवड करण्यात आली. त्यामुळे ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री असतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. उद्या दुपारी तीन वाजता रावत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. या सोहळ्याला अमित शहा, जे. पी. नड्डा यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
उत्तराखंडमधील डोईवाला मतदारसंघातून रावत निवडून आले आहेत. ते १९८३ ते २००२ या कालावधीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रीय होते. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी त्यांची जवळीक असल्याचे मानले जात आहे. २००७-२०१२ मध्ये भाजप सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून काम केले होते. सध्या ते पक्षासाठी झारखंडमधील कामकाज बघतात.