Menu

मनोरंजन
नव्या दमाचा इराणी सिनेमा…

nobanner

‘सेल्समन’ या असगर फरादी दिग्दर्शित इराणी चित्रपटाला यंदाचे परदेशी चित्रपट विभागातील ऑस्कर मिळाले आहे. त्यानिमित्त प्रतिकूल राजकीय, सामाजिक परिस्थितीशी झगडणाऱ्या इराणी सिनेमाविषयी-
सद्यकाळात जगभरातील सिनेमा कात टाकतो आहे. त्यात अनेक स्थित्यंतरे येताहेत. छोटेसे कथाबीज असणारे नानाविध विषय असणारे चित्रपट केले जाताहेत. आजवर ज्यांना चित्रपटाचे कथाविषय समजले गेले नाहीत त्यावरही चित्रपटनिर्मिती केली जाते आहे. हा बदल सुखावहही आहे आणि विचारप्रवण आहे. क्रियाशीलतेवर जास्त लक्ष असणारे कमी बजेटचे चित्रपट बनवून आपलं म्हणणं जगापुढे मांडणं हा नवा फंडा मागच्या वर्षांत जगभरातील चित्रपटसृष्टीने अवलंबला होता. आपल्याकडेही असे प्रयोग झाले आहेत. ‘चॉक अँड डस्टर’, ‘चौरंग’, ‘जुगनी’, ‘जुबां’ हे चित्रपट या पठडीतले होते. आपल्याकडे तुलनेत सर्व साधने आणि स्थैर्य आहे त्यामुळे विषयातील विविधता आणखी मोठय़ा प्रमाणात अपेक्षित आहे. त्या मानाने मराठीत छान प्रयोग झाले. ‘कोर्ट’, ‘व्हेंटिलेटर’ ही ठळक नावे. जगभरात या मोहिमेला उधाण आलेय हे आपण समजू शकतो पण जे देश अस्थिरता आणि अस्वस्थता यांनी तीनेक दशकांपासून ग्रासलेले आहेत तिथेही असे बदल घडत असतील तर ते निश्चितच गौरवास्पद व क्रांतिकारक ठरावेत. त्यातही इराणी चित्रपटसृष्टीच्या सध्याच्या वाटचालीने त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा भविष्यात खूप उंचावल्या आहेत. खरे तर एकीकडे चित्रपट निर्मितीची साधने आणि सवलती यांची वानवा आणि दुसरीकडे अनेक प्रकारची बंधने व विविध नियमांची सक्ती याच्या कात्रीत इराणमधील चित्रपटसृष्टी कशीबशी तग धरून आहे. असे असूनही मागील वर्षांत तिथे काही आगळ्यावेगळ्या विषयांना हात घालणारे देखणे आणि चिंतनप्रवृत्तीकडे झुकवणारे चित्रपट तयार झाले. त्यांचा हा धांडोळा.
‘रेडिओ ड्रीम्स’ हा चित्रपट अमेरिका आणि इराणची संयुक्त निर्मिती आहे. ही कथा आहे हमीद रोयानी नावाच्या तरुण रेडिओ स्टेशन मॅनेजरची. सॅनफ्रॅन्सिसकोच्या बे एरियातील पार्स रेडिओमध्ये तो रुजू झालेला आहे. तिथल्या जॅम सेशनमध्ये आणि जॅझ टय़ुिनगमध्ये त्याला अफगाण रॉकबँड ‘काबूल ड्रीम्स’ आणि मेटल संगीतातील दिग्गज असणाऱ्या ‘मेटालिका’चे फ्युजन घडवून आणायचे आहे. परंतु ‘काबूल ड्रीम्स’च्या अडचणींची जंत्री संपत नाही. त्यांना उशीर होत जातो. हमीद निराश होऊन जातो. मात्र त्याच्या मनात द्वंद्व सुरू असते. त्याला ‘काबूल ड्रीम्स’च्या यशाची खात्री असते. दरम्यान रेडिओ स्टेशनच्या मालकाकडून व्यावसायिक अडचणी आणल्या जातात, त्याला तोंड देत स्वत:च्या दैनंदिन आयुष्यातील लहानसहान घडामोडींशी दोन हात करत तो आपली सृजनात्मकता जिवंत ठेवतो. अगदी छोटासा विषय आहे पण त्याला अफगाणी व इराणी संस्कृतीची झालर लावून सादर केल्याने मनाचा वेध घेतो. या चित्रपटातील संगीतासमोर भाषेच्या मर्यादा थिटय़ा पडतात.
‘अंडर द श्ॉडो’ हा चित्रपट म्हटले तर भयपट आहे, थरारपट आहे आणि पिरीयड मूव्हीही आहे. काही दशकांपूर्वी इराक-इराण युद्धात दोन्ही बाजूंनी प्रचंड हानी झाली. देशांची अर्थव्यवस्था विस्कळीत होण्यापासून ते प्रचंड जीवितहानीपर्यंत अपरिमित नुकसान झाले. या चित्रपटाची कथा एका घराची आहे. घरातील त्रिकोणी कुटुंबाची आहे. युद्धात डागलेले मिसाईल थेट घरात येऊन पडते. घर उद्ध्वस्त होते, ते विस्थापित होतात. युद्धामुळे हतबल झालेल्या इतर अनेक नागरिकांप्रमाणे शहर सोडून जातात. नव्या घरी गेल्यानंतर त्यांना पछाडल्यासारखे वाटू लागते. भास होऊ लागतात. अज्ञात शक्तींकडून प्राणघातक हल्ले होतात. भीतीने त्यांचे जीवन व्यापून जाते. या दुष्ट शक्ती आणि युद्धात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची तार जुळलेली असते. अंगावर काटे आणणारा हा सिनेमा एकाच वेळी युद्धपटाचा आणि भयपटाचा दमदार प्रत्यय देतो. कथेची पाश्र्वभूमी म्हणून इराक-इराण युद्धाचा वापर मोठय़ा खुबीने केला आहे. काही दृश्ये अंगावर शहारे आणतात. मागील दशकात भयपटाच्या नावाखाली चित्रविचित्र मेकअप केलेले चेहरे प्रेक्षकांच्या माथी मारले गेलेत. आपल्याकडे पूर्वी रामसे बंधू हाच फॉम्र्यूला वापरायचे. त्या युक्त्या क्लृप्त्यांना फाटय़ावर मारून आणि भयनिर्मितीसाठी तंत्रज्ञानाचा आततायी वापर टाळून केवळ कथेतील बांधणीने चित्रपट खिळवून ठेवतो. युद्धाच्या विनाशकारी परिणामांकडेही नकळत दिशानिर्देश करण्यात चित्रपट कमालीचा यशस्वी होतो. याचे श्रेय दिग्दर्शक बाबक अन्वारी यांना जाते.
‘हॅम्समॅन’ हा चित्रपट अत्यंत अनोख्या विषयावरचा आहे. तसे पाहिले तर बालमनाचे विविध पदर यात हळुवारपणे उलगडले आहेत. पण त्यात नसíगक आपत्तीची आणि नात्यातील रुक्षतेची बेमालूम मिसळ करण्यात आली आहे. या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे यातील प्रत्येक फ्रेम देखणी आहे. एखादे पोट्र्रेट पाहात असल्याचा भास संपूर्ण चित्रपटात होत राहतो. किनारपट्टी आणि दलदलीत रूपांतरित झालेले सरोवर याचा वापर कॅनव्हाससारखा केला आहे. डोळे विस्फारून ती चित्रे प्रेक्षक चक्षुस्मृतीत साठवत जातो. हसन आणि त्याच्या मित्राची ही कथा आहे. हसनचे वडील घर सोडून निघून गेलेले असतात. उर्मिया सरोवरातील पाणी संपून गेलेले असते, उरलेली असते ती फक्त दलदल. तिथेच किनारपट्टीवर त्यांचे जहाज गंजलेल्या अवस्थेत पडून असते. हसन आणि त्याचा मित्र चंग बांधतात की मृतावस्थेत पडून असणाऱ्या या जहाजास काहीही करून संजीवनी द्यायचीच. आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना दुरुस्त केलेले जहाज भेट म्हणून दिले की ते पुन्हा घर सोडून जाणार नाहीत अशी त्याची आशा असते. अहोरात्र मेहनत करून, कधी कधी लपूनछपून तर कधी कधी इतर नाविकांचे वैमनस्य पत्करून ते जहाजास पूर्ववत करतात. त्याचे वडील परततात की नाही हे पडद्यावर बघणे इष्ट. हळुवार पद्धतीने मांडणी केलेली असल्याने चित्रपट मनाचा ठाव घेतो. ‘ब्लॅक लिट्ल फिश’ या प्रसिद्ध चित्रपटाचा दिग्दर्शक माजिद इस्माईलने हा चित्रपट आपल्या चित्रमय शैलीत अक्षरश: चितारला आहे. नॅरेटिव्ह शैलीत याचे सादरीकरण असल्याने वेगळाच फील चित्रपटाला आला आहे.
‘रेिव्हग इराण’ हा चित्रपट अफलातून आहे. दोन तरुण महत्त्वाकांक्षी डीजेंची कथा यात आहे. इराणमध्ये असणारी इस्लामी राजवट आणि तिथला संगीतविरोध त्यांना ठाऊक आहे तरीही संगीत काही केल्या त्यांच्या डोक्यातून जायला तयार नसते. काहीही दिव्य करून, रोजच मोठी जोखीम पत्करून ते आपली हौस भागवत असतात. पोलिसांना त्यांच्या उपद्व्यापाची कुणकुण लागते. त्यांचा पाठलाग केला जातो. रोजच्या लपूनछपून जगण्याला आणि आपल्या कलेची, कारकीर्दीची घुसमट होताना त्यांना कासावीस व्हायला होते. एक अखेरचा प्रयत्न म्हणून एक मोठी जोशिली म्युझिक रेव्ह पार्टी आयोजित करून याची अखेर करावी या विचारापर्यंत ते येतात. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून हे दिव्य ते पार पाडतात. त्यानंतर ते आपल्या म्युझिक अल्बमची बेकायदेशीर विक्री करून गुजराण करत राहातात. आणि त्यांच्या आयुष्यात ट्वीस्ट येतो. जगातील सर्वात मोठय़ा टेक्नो म्युझिक फेस्टिवलचे निमंत्रण त्यांना येते. त्यांच्या ग्रुपला स्वर्ग दोन बोटे उरतो. जावे की न जावे आणि कसे जावे या दोन्ही प्रश्नांवर मात करून ते तेहरानला अलविदा करतात. ते स्वित्र्झलडमध्ये फेस्टिवलला पोहोचतात. तिथला जामानिमा, तिथली आतषबाजी, रोषणाई, दिलखेचक संगीतावर मनमुराद थिरकणारी तरुणाई, रंगीबेरंगी दुनिया आणि समृद्धी बघून अत्यानंदाच्या लाटांवर ते स्वार होतात. पण हा आनंद जास्त काळ टिकत नाही. त्यांच्या प्रवासी व्हिसाची मुदत संपून जाते आणि त्यात ते इराणी असल्याने वेगळेच संकट त्यांच्यापुढे उभे ठाकते. त्यात भरीस भर म्हणून मायभूमीच्या आठवणी त्यांच्या मनात दाटून येऊ लागतात. त्यांच्या घरून मात्र परत न येण्याविषयी, आपले नवे आनंदी आयुष्य जगत तिथेच राहण्याविषयी सुनावले जाते. त्यांच्या पुढे प्रश्न उभा राहतो. आपल्या मायभूमीत परत जावे की नाही? विचारांच्या कोंडीत ते अडकतात. परत गेलो तर पुन्हा ते जोखमीचे जिणे जगावे लागेल हे पक्के ठाऊक असते तरीही ते संगीत आणि मायभूमी दोन्हीची निवड करतात. इराणमधील अशांत पाश्र्वभूमीचा अत्यंत चपखल वापर कथेत केला असल्याने चित्रपट उत्कंठावर्धक बनला आहे. यातील संगीतही साजेसे आहे. सुसान रेजीन या जर्मनीतील प्रतिभाशाली दिग्दíशकेने हा डॉक्युमेंट्री वर्गातील हा चित्रपट बनवला आहे.
चित्रपट निर्मितीसाठी तब्बल वीस वष्रे बंदी घातलेल्या जाफर पनाही यांची निर्मिती असलेला ‘टॅक्सी’ म्हटलं तर एक कविता आहे, एक प्रेमपत्र आहे, काळीज हेलावून टाकणारे आय ओपनर आहे. त्यांनी स्वत: यात टॅक्सीचालकाचा लीड रोल केला आहे. संपूर्ण चित्रपट गुप्त पद्धतीने छुप्या कॅमेऱ्याने चित्रित केला आहे. पनाहींच्या टॅक्सीत येऊन बसणाऱ्या विविध माणसांशी ते बोलत राहतात, त्यातून इराणी जीवनशैलीचे आणि तिथल्या परस्पर अवगुंठीत समस्यांचे अनेक पदर अलगद उलगडत जातात, जे जगापुढे आजवर कधी आले नाहीत. अनेक छोटय़ा छोटय़ा घटनांतून तिथले आयुष्य समोर येत राहाते. चोरापासून ते शाळेत जाणाऱ्या विद्याíथनींपर्यंत, हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धापासून ते फिशटँकमधील चिमुकल्या माशांवर जीव लावणाऱ्या गृहिणीपर्यंत अनेक लोक येत राहतात. त्यांच्याशी संवाद करत जाफर त्यांना बोलते करतात. एक अनोखी कल्पना वास्तवात उतरवून हा चित्रपट निर्मिला आहे.
‘नाहिद’मध्ये एका स्त्रीच्या मनाची भावनिक गुंतागुंत आहे. कास्पियन समुद्राच्या सीमेवरील एका छोटय़ाशा शहरातील स्त्रीची ही कथा. टायपिस्टचे काम करणारी नाहिद ही एक मध्यमवयीन घटस्फोटित तरुणी आहे. ड्रग्ज आणि जुगाराच्या विळख्यात अडकलेल्या अहमदपासून तिने घटस्फोट घेतला आहे, मात्र आईपासून दूर राहिल्यामुळे वाह्य़ात बनलेल्या तिच्या दहा वर्षांच्या मुलाची अमीरची कस्टडी तिला हवी असते. पण अहमद काही केल्या तिची डाळ शिजू देत नसतो. या दरम्यान नाहिद विधुर असलेल्या मसूदच्या जवळ येत जाते. तिचे त्याच्यावर प्रेम बसते. मसूद व्यवसायाने हॉटेलमालक आहे, सुस्थितीतला प्रौढ आहे. त्यालाही नाहिद पसंद आहे, पण त्याच्या विचारात आपल्याबद्दल खुलेपण आहे का किंवा आपल्या मुलासाठी त्याच्या आयुष्यात स्पेस आहे का याची चिंता नाहिदला असते. एकीकडे अहमदशी संघर्ष चालू असतो, दुसरीकडे मुलासाठी जीव कातरत जातो तर मसूदविषयी साशंकता जाणवते अशा कात्रीत नाहिद अडकते. तिथल्या विवाहविषयक कायद्यातील किचकट अटींमुळे ती अजूनच पेचात पडते. तात्पुरता काही काळाचा करार पद्धतीचा विवाह करण्याची रिस्क घ्यावी का नको या द्विधा मन:स्थितीत ती अडकते. एकल मातृत्व असलेल्या स्रीच्या मनाचा कोंडमारा यात विलक्षण पद्धतीने साकारला आहे. यातही इराणच्या कायद्यांचा वापर कथेतले अंग म्हणून सफाईदारपणे केला आहे.
‘इम्मॉर्टल’ हा चित्रपट डोक्यात खिळा ठोकावा तसा रुतून बसतो. त्यातला आशय अस्वस्थ करून जातो. अयाज नामक साठीत पोहोचलेल्या एका एकांतवासात जगणाऱ्या वृद्ध आजोबाची आणि इब्राहिम नावाच्या कुमारवयीन नातवाची कथा यात आहे. अयाज स्वत:ला जीवनापासून विलग करू पाहतोय. त्याचा नातू आणि मृत पत्नीचा आवाज रेकॉर्ड केलेली ऑडिओ कॅसेट हेच काय ते त्याच्या आयुष्यातील सजीवतेचे कारण आहेत. आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या हत्याकांडास आपण जबाबदार असल्याची टोचणी अयाजला शांतचित्ताने जगू देत नाही. फ्लॅशबॅकच्या रूपाने त्याचे गतजीवन आस्ते कदम त्याच्या आयुष्यात डोकावत राहते. हत्याकांडाची दृश्ये अंगावर काटा आणतात, मेंदू बधिर होऊन जातो. वृद्धत्व आणि अपराधित्व याच्या सीमारेषा अस्वस्थ करून जातात. इब्राहिमच्या समवयीन मत्रिणीचे नíगसचे उपकथानक यात आहे. आठवणींचे अमरत्व हे वाढत्या वयाबरोबर सलत जाते आणि कधीच नष्ट होत नाही हे यातून मनावर ठसते. चित्रपटातील फ्रेम्स भुरळ पाडणाऱ्या आहेत. इंग्रजी सब टायटल्स नसती तरी चित्रपट कळला असता.
‘ए रोमँटिक रॉबरी’ हा नर्मविनोदी चित्रपट आहे. जुन्या काळातले दोन अट्टल पण भुरटे चोर कमाल आणि जमाल यांची कथा यात आहे. प्रदीर्घ शिक्षेनंतर हे दोघे कारागृहातून बाहेर पडतात आणि त्यांचा जुना साथीदार इस्सीकडे ते रवाना होतात. शेवटच्या जबरी चोरीतील मुद्देमालाची रक्कम त्यांनी त्याच्याकडेच ठेवलेली असते. हे दोघे जेलमध्ये गेल्यावर दरम्यानच्या काळात इस्सीने ते पसे एका टुकार चित्रपटाच्या निर्मितीत लावलेले असतात. चित्रपट तयार होतो आणि सणकून आपटतो. त्याचे पदरचे पसेही त्यात स्वाहा होतात. पशाची चटक लागलेल्या, आता गलितगात्र झालेल्या कमल आणि जमालपुढे आता पशाची निकड उभी राहते. त्यांचा चौर्यकर्माचा मूळ स्वभावही उफाळून येतो, पण मधल्या काळात जग खूप बदलले आहे याचा त्यांना विसर पडतो. जुनाट पद्धतीने आपल्याला चोऱ्या करणे केवळ अशक्य आहे हे त्यांच्या लक्षात येते. साध्यासुध्या गोष्टीतून व्यंगात्मक पद्धतीने दिग्दर्शक अमीर रिझवीने खुमासदार पद्धतीने चित्रपट साकारलाय. त्यातली करुणेची झाक मात्र अस्वस्थ करून जाते.
‘हेट्रेड’मध्ये इराणी निर्वासितांच्या प्रश्नावर फोकस केला गेलाय. इराक युद्धादरम्यान देशातील युद्धजन्य परिस्थिती आणि वाढती अस्थिरता यामुळे तुर्कीच्या सीमेवर जाऊन राहिलेल्या दोन कुटुंबांची ही कथा आहे. हमीद आणि झालेह ही त्यांच्या तिसऱ्या पिढीतील मुले. त्यांचा जीव तुर्कीमध्ये रमत नाही, त्यांना मायदेशी जायचेय. पण त्यांच्या कुटुंबात एकमत होत नाही. देशांच्या सीमा आणि प्रेम यांची गुंतागुंत यात हळुवार मांडली आहे. ‘द मॅन हू बिकम्स हॉर्स’ ही एक तरल भावकविता आहे. आपल्या पत्नीच्या अकाली मृत्यूनंतर आपल्या एकुलत्या मुलीसोबत एका शुभ्र अरबी घोडय़ाबरोबर राहणाऱ्या प्रौढ पित्याच्या जिवाची घालमेल अशी काही साकारली आहे की प्रेक्षक दिङ्मूढ होऊन जातो. मुलीच्या लग्नानंतर ती पित्याच्या अपरोक्ष त्या घोडय़ाला सोडून देते. कारण त्या घोडय़ापायी जन्मदात्या पित्याने तिच्या पतीला जिवे मारण्याचा असफल प्रयत्न केलेला असतो. मुलीने घोडय़ाला सोडून दिल्यावर तिच्या वडिलांच्या डोक्यावर परिणाम होतो. ते पुरते भ्रमिष्ट होऊन जातात. एकटेपणामुळे वागण्यात होणारे बदल आणि कमालीचे संवेदनशील मन यामुळे नाती कशी विस्कटत जातात याचा हृद्य आलेख या चित्रपटात रेखाटला आहे. यात मुख्य भूमिका करणारा मेहमूद नझर आणि त्याचा तो शुभ्र देखणा घोडा डोक्यात रुतून बसतात. संपूर्ण चित्रपटाला निळी झाक दिल्याने उदासीनता जाणवत राहते जी अधिकच अस्वस्थ करून जाते.
‘स्टारलेस ड्रीम्स’ हा मागच्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट इराणी सिनेमा ठरावा. डोके भंडावून सोडणारे कथानक यात आहे. हा चित्रपट म्हणजे बालपण हिरावून घेतले गेलेल्या सात कुमारिकांच्या चुरगाळलेल्या आयुष्याचे मखमली पोट्र्रेटच. सलग सात वष्रे अनेक खेटे मारल्यानंतर याच्या चित्रीकरणास अनुमती मिळाली. महिला सुधारणा आणि पुनर्वसन गृहाच्या नजरकैदेत राहात असलेल्या सात टीनएजर मुलींची ही रिअल लाइफ कथा. सातही जणींची इथे येण्यामागची पाश्र्वभूमी भिन्न आहे. कुणी आपल्या पित्याचा खून करून आलेली तर कुणी एक कोकेनच्या तस्करीतून, तर कुणी हत्यार बाळगल्याने, अपहरणात सामील झाल्याने, आत्महत्येचा प्रयत्न केल्याने, चोरी केल्याने तिथे दाखल झालेली असते. देवाला न मानणाऱ्या बंडखोर विचारांच्या या मुली इथून घरी परत जायला राजी नसतात. कारण घर हा याहून मोठा तुरुंग आहे असे त्यांना वाटते. नुसते परत जाण्याच्या कल्पनेने त्या भेदरून जातात. त्यांची दु:खे आपल्याला अंतर्बाह्य़ िझझोडतात, आपल्या सुखवस्तू जीवनाशी आपल्याला नकळत तुलना करायला भाग पाडतात. प्रत्येक मुलीचे भावविश्व हळूहळू उलगडत जाते आणि त्यागणिक आपली तगमग वाढत जाते. त्या मुलींचे स्वप्न असते, आपल्याला सहज आणि लवकर मृत्यू यावा! चित्रपट संपतो तेव्हा मन बधिर होऊन गेलेले असते. चित्रपटाचे संकल्पक, लेखक, दिग्दर्शक असणारे मेहरेद ओस्कोई यांनी याआधी इराणी तुरुंगवासातील मुलांवर देखील असाच चित्रपट बनवला होता. ‘स्टारलेस ड्रीम्स’ला मागच्या वर्षी पुरस्कारांची भलीमोठी जंत्री लाभली होती. याशिवाय ‘डॉटर’, ‘मलेरिया’, ‘बारकोड’, ‘इन्व्हर्जन’ हे काही उल्लेखनीय चित्रपट होत.

द सेल्समन आणि असगर फरादी
‘द सेल्समन’ या असगर फरादी दिग्दर्शित सिनेमाला यंदाचे परदेशी सिनेमांच्या विभागातील ऑस्कर मिळाले. फरादी यांना यापूर्वी ‘ए सेपरेशन’साठी ऑस्कर मिळालेले आहे. स्त्रीची अगतिकता, तिच्याकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन आणि समाजातील वासनाविकार यांचे कंगोरे लयबद्ध तऱ्हेने ‘द सेल्समन’मधून उकलत जातात. या सिनेमातील इमाद आणि रना हे जोडपे नाटय़कर्मी आहे. ते आर्थर मिलरच्या ‘द डेथ ऑफ सेल्समन’मध्ये अभिनय करतात. पण एके दिवशी नाटकातील नाटय़ त्यांच्या जीवनात सत्यात उतरतं. बॉम्ब वर्षांवात घर उद्ध्वस्त झाल्याने ते एका दलालाच्या माध्यमातून एका नव्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होतात. या घरात आधीची सामग्री म्हणजे चपलांचे, शूजचे अनेक जोड असतात. ढीगभर सौंदर्यप्रसाधने असतात. बहुमजली इमारतीचा हा टेरेस फ्लॅट असतो. अत्यंत देखणी आणि नीटस अशी त्याची रचना त्या दोघांना पाहता क्षणी भावलेली असते. पण हळूहळू त्यांच्या जीवनात नाटय़मय बदल घडू लागतात. तिचा पाठलाग होऊ लागतो. काही जण तिला बाहेर गाठून तिच्याशी लगट करायचा प्रयत्न करू लागतात. त्यातूनच तिच्यावर हल्ला होतो. सुरुवातीस इमाद रनावर संशय घेतो. पण त्याला कळून चुकतं की रना तशी स्त्री नाहीये. मग ते दोघे मिळून तिच्या मागावर असणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करतात.
रना घरी नसताना भडक वेशभूषा, मेकअप केलेली एक स्त्री घरात घुसण्याचा प्रयत्न करते तेव्हा इमाद सावध होतो. तो अपार्टमेंटचीच चौकशी सुरू करतो आणि कळतं की त्या घरात त्यांच्या आधी एक शरीरविक्रय करणारी स्त्री राहत असते. कालांतराने कमाई घटल्यावर ती नव्या जागेत गेलेली असते. मात्र आपलं पडून असलेले सामान नेण्यासाठी ती परत येते. स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन किती दूषित असतो याचे बोलके उदाहरण म्हणजे हा चित्रपट सुरुवातीपासून प्रेक्षकावर पकड ठेवतो. त्याची पटकथा अत्यंत तगडी आहे. इराणी भाषा कळत नसली तरी त्याची कुठे अडचण जाणवत नाही. चित्रपट संपल्यावरही आपण बराच वेळ त्यातल्या आशयविषयात गुंतून राहतो हे याचे निर्भेळ यश म्हणावे लागेल. संगीत, ध्वनिमुद्रण, नेपथ्य, लाइट इफेक्ट्स सारं काही एकमेकास साजेसं असं आहे. याची इंग्लिश डब व्हर्जन आयएमडीबीवर उपलब्ध आहे.
ऑस्कर सोहळ्याला अनुपस्थित राहून असगर फरादी यांनी ट्रम्प यांचा निषेध केला.