खेल
रोहित शर्मा व पार्थिव पटेल कर्णधार
भारतीय संघाचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताच्या ‘ब्ल्यू’ व ‘रेड’ संघांचे नेतृत्व अनुक्रमे रोहित शर्मा व पार्थिव पटेल यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. ‘ब्ल्यू’ संघात अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगला स्थान मिळाल्यामुळे त्याला भारताच्या वरिष्ठ संघात पुनरागमनाची संधी चालून आली आहे. हरभजनने यंदाच्या मुश्ताक अली चषक व विजय हजारे चषक या दोन्ही स्पर्धामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ख्याती असलेल्या सुरेश रैनाला कोणत्याच संघात स्थान न मिळाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या स्पर्धेत ‘ब्ल्यू’ व ‘रेड’ या संघांना हजारे चषक विजेत्या तामिळनाडूबरोबर खेळावे लागणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघातील महेंद्रसिंग धोनी व युवराज सिंग यांना विश्रांती देण्यात आली आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यातील या स्पर्धेत पार्थिव पटेल याच्याबरोबरच ऋषभ पंत (भारत ब्ल्यू) व दिनेश कार्तिक (तामिळनाडू) या तिन्ही यष्टिरक्षकांमध्ये भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळविण्यासाठी चुरस राहणार आहे. ही स्पर्धा २५ मार्चपासून विशाखापट्टणम येथे सुरू होत आहे.
संघ
भारत ‘ब्ल्यू’- रोहित शर्मा (कर्णधार), मनदीपसिंग, श्रेयस अय्यर, अंबाती रायुडू, मनोज तिवारी, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक हुडा, हरभजन सिंग, कृणाल पंडय़ा, शहबाझ नदीम, सिद्धार्थ कौल, शार्दूल ठाकूर, प्रसित कृष्णा, पंकज राव.
भारत ‘रेड’- पार्थिव पटेल (कर्णधार व यष्टिरक्षक), शिखर धवन, मनीष पांडे, मयांक अगरवाल, केदार जाधव, इशांक जग्गी, गुरकिरत मान, अक्षर पटेल, अक्षय कर्णेवार, अशोक दिंडा, कुलवंत खेजरोलिया, धवल कुलकर्णी, गोविंद पोद्दार.
भारतीय संघातील स्थानासाठी वरिष्ठांपुढे तरुणांचे आव्हान – श्रीजेश
बंगळुरू : भारताच्या वरिष्ठ संघातील स्थानासाठी अनुभवी खेळाडूंना तरुण व नैपुण्यवान खेळाडूंचे आव्हान निर्माण झाले आहे. ही हॉकी खेळाचीच प्रगती आहे, असे भारताच्या वरिष्ठ हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेश याने सांगितले.
टोकियो येथे २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी आतापासूनच संघबांधणी व्हावी यासाठी संभाव्य खेळाडूंमध्ये युवा खेळाडूंना स्थान देण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळेच भारतीय संघातील कोणत्याही खेळाडूचे स्थान पक्के राहिलेले नाही.
श्रीजेशने सांगितले, ‘भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूसाठी पर्यायी खेळाडू निर्माण झाले आहेत ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे. त्यामुळे खेळाची प्रगती होण्यास मदत होणार आहे. संघातील प्रत्येक खेळाडू आपले स्थान राखण्यासाठी सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल तसेच संभाव्य खेळाडू भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी सर्वोत्तम कौशल्य दाखविल. आगामी ऑलिम्पिकसाठी कनिष्ठ संघातील खेळाडूंवर सध्या लक्ष केंद्रित केले जात आहे. या खेळाडूंनी स्वत:चे कौशल्य वाढीवर तसेच नियोजनबद्ध खेळावर भर दिला पाहिजे. सराव शिबिर ही त्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. वरिष्ठ खेळाडूंना शारीरिक तंदुरुस्ती टिकविण्याबरोबरच कनिष्ठ खेळाडूंच्या वेगवान चालींसारख्या चाली करण्यावर लक्ष द्यावे लागणार आहे.’
राष्ट्रीय शिबिर सहा आठवडे चालणार असून, शिबिरातील खेळाडूंना एकमेकांचे गुणदोष जाणून घेण्याची व त्याद्वारे एकमेकांमधील समन्वय वाढविण्याची संधी मिळणार आहे. खेळातील डावपेचांची आखणी व त्याची अंमलबजावणी हेदेखील या शिबिरात शिकावयास मिळणार आहे. कनिष्ठ खेळाडूंनी त्याचा फायदा घेतला पाहिजे. तसेच सरदारासिंग, एस. व्ही. सुनील आदी अनुभवी खेळाडूंकडूनही या नवोदित खेळाडूंना भावी कारकीर्दीसाठी शिकवणीची शिदोरी लाभणार आहे, असे श्रीजेश याने सांगितले.
अर्जुन हलाप्पा व जुगराजसिंग यांना भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये स्थान देण्यात आले आहे. या निर्णयाचे स्वागत करीत श्रीजेश म्हणाला, या दोन्ही खेळाडूंकडे आंतरराष्ट्रीय सामन्यांचा भरपूर अनुभव असल्यामुळे शिबिरात त्यांच्याकडूनही भरपूर शिकावयास मिळणार आहे.