देश
नशीब आपल्या निर्णयांवर डीआरएस अपील होत नाही; मोदींची मिष्किल टिप्पणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्यात सोमवारी झालेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान मोदींच्या मिष्किल स्वभावाची झलक पाहायला मिळाली. यावेळी मोदींनी द्विपक्षीय भेटीत झालेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर बोलताना म्हटले की, नशीब आपल्या निर्णयांवर डीआरएस अपील केले जाऊ शकत नाही. नुकत्याच झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका दोन्ही संघाच्या खेळाडूंमधील वादाने प्रचंड गाजली होती. हाच धागा पकडत पंतप्रधान मोदी यांनी भारत-ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय करारावर मजेशीर भाष्य केले. यावेळी मोदींनी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि भारतीय कर्णधार विराट कोहली यांचा दाखला दिला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, ऑस्ट्रेलियाच्या संसदेत केलेल्या भाषणात मी महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन आणि सचिन तेंडुलकर यांचा उल्लेख केला होता. आज भारतीय क्रिकेट संघाला विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन संघाला स्मिथ हे दोन युवा कर्णधार आकार देत आहेत. ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचा हा दौरादेखील स्मिथच्या फलंदाजीसारखा फलदायी ठरेल, असे मोदी यांनी म्हटले. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये आज सहा करार करण्यात आले. आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि संगठित गुन्हेगारी यांचा मुकाबला करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाला. नागरी उड्डाण सुरक्षा क्षेत्रातील सहाय्यासाठीदेखील दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. पर्यावरण, जलवायू आणि वन्यजीव क्षेत्रातील सहाय्यासाठी तिसरा करार करण्यात आला. तर आणखी एक करार क्रीडा क्षेत्रातील सहयोगासाठी करण्यात आला आहे.
या द्विपक्षीय चर्चेतनंतर मोदी यांनी माल्कम टर्नबुल यांच्यासोबत दिल्ली मेट्रोने प्रवास केला. मेट्रोने प्रवास करण्यासाठी दोन्ही देशांचे पंतप्रधान ४ वाजता मंडी हाऊस मेट्रो स्थानकावर पोहोचले. दोन्ही पंतप्रधान मेट्रो स्थानकाजवळ पोहोचताच उपस्थितांनी ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा दिल्या. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रोचे स्थानक रिकामी करण्यात आले होते. मेट्रोमध्ये माल्कम टर्नुबल यांच्यासोबत पंतप्रधान मोदी यांनी सेल्फीदेखील काढला. दोन्ही पंतप्रधानांनी मंडी हाऊसपासून अक्षरधामपर्यंत मेट्रोतून प्रवास केला. मेट्रो स्टेशनमधून बाहेर पडल्यावर दोन्ही नेते अक्षरधाम मंदिरात पोहोचले. यमुनेच्या काठावरील अक्षरधाम मंदिर जवळपास १०० एकरावर वसलेले आहे.